साहित्य आणि कला
- Get link
- X
- Other Apps
नमस्कार रसिक वाचक,
ब्लॉगची सेटींग्ज चेंज झाल्यामुळे अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया सेंड होत नाहीत पण आपण व्हाट्सएपवर प्रतिक्रिया पाठवून कळविले त्याबद्दल मनापासून धन्यवाद!
आता प्रतिक्रिया देताना तुमचा ई-मेल आयडी, पासवर्ड टाकल्यावर म्हणजेच लॉग इन केल्यावरच प्रतिक्रिया पोस्ट होत असते. तसदीबद्दल क्षमस्व.
साहित्य आणि कलेतून मी काय मिळविते? २००४ साली 'प्रतिबिंब मासिकाने एक लेखस्पर्धा आयोजीत केली होती. स्पर्धेचा विषय होता 'साहित्य आणि कलेतून मी काय मिळवतो?' मला स्पर्धेतला 'मिळवतो' हा शब्दच खटकला की अरे मिळवतो म्हणजे या स्पर्धेत स्रियांनी भाग घ्यायचा की नाही. पुल्लिंगी क्रियापद कदाचित स्पर्धा घेणाऱ्यांच्या लक्षात आले नसावे! असो, ही स्पर्धा नक्कीच स्त्री-पुरूष दोघांसाठी असावी असा विचार करून लेख लिहिला नि दिला पुण्याच्या पत्त्यावर पाठवून. स्पर्धेसाठी लिहिलेला लेख पोस्टाने पाठवून दिला नि त्यानंतर मी विसरूनही गेले नि जवळजवळ पाच-सहा महिन्यांनी एक मासिक माझ्या पत्त्यावर आले नि बघते तर काय? माझ्या लेखाला द्वितीय पारितोषिक मिळाले होते आणि मी पाठवलेला लेखही त्या मासिकात प्रकाशित झाला होता. लेख छापून आला याचा आनंद तर होताच पण त्याचबरोबर पारितोषिक मिळाल्याचा आनंद अजूनच द्विगुणित झाला. तर मग साहित्य आणि कलेतून मी काय मिळविते? याचे उत्तर द्यायचे म्हटले तर साहित्य आणि कलेतून मला माझ्या जीवनाचा खरा अर्थ समजला आहे. साहित्याने मला जीवन कसे जगावे? हे शिकविले तर कलेने जीवनाचा आनंद कसा घ्यायचा? हे शिकविले.
संत साहित्याने मला शत्रूचेदेखील वाईट चिंतण्याची दुर्बुद्धी न देता त्याचे हित चिंतणारी सुबुद्धी दिली. संत साहित्याच्या वाचनाने मानापमानाच्या कल्पनेला तिलांजली देऊन मला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यास शिकविले. तसेच समोरची व्यक्ती माणूस आहे, तिच्याशी माणसाप्रमाणे व्यवहार करावा. या गोष्टीची जाणीव करून दिली. आत्मचरित्रात्मक साहित्यातून खूप काही शिकायला मिळाले. आनंद यादवांच्या 'झोंबी' ने अडचणींचा बाऊ न करता शिकत राहण्याचा मंत्र दिला. 'आनंदी गोपाळ' मधील आनंदीबाईंचा संघर्ष खूप काही शिकवून गेला. 'नॉट विदाउट माय डॉटर' मधील बेट्टी मेहमूदीने जीवनात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास शिकविले. 'एक होता कार्व्हर' ने सतत उद्योग करीत राहण्यास शिकविले व वेगवेगळ्या कल्पना लढवून प्रयोग करीत राहण्याचा मंत्र दिला. प्रवासवर्णनांनी एका जागी बसून जगाचे दर्शन घडविले. स्त्रीवादी साहित्यातून स्त्री-पुरुष यांच्या नात्यातील अनेक पदर उलगडत गेले. दलित साहित्याने इतरांच्या दुःखाशी समरस होण्यास शिकविले. कोणतीही कला असो, त्या कलेतून मला निखळ, निर्मळ आनंद उपभोगता आला. इतरांचे साहित्य वाचून माझ्यावर संस्कार होत गेले. तसेच दुसऱ्याची कला कला पाहताना निर्मळ आनंद उपभोगता आला. याउलट स्वतःच्या साहित्यातून मात्र अस्वस्थता मिळत गेली. तर स्वतःच्या कलेतून जगाचा विसर पडायला होते. जेव्हा मी एखाद्या विषयावर लिहायला बसते, तेव्हा त्यातली अधीरता नंतर अस्वस्थतेत परावर्तित होते. कारण आपल्याकडून काहीतरी निसटतं आहे. ते नेमकं शब्दांत पकडणे शक्य होत नाही. माझ्या कलेचं मात्र साहित्याच्या अगदी उलट आहे. मेंदीचे भेटकार्ड रेखाटताना मी माझीच राहत नाही किंवा या जगाशी असलेला माझा संबंधदेखील काही क्षणांसाठी तुटून जात असतो आणि भेटकार्ड तयार झाल्यावर एक सुखद भावना मनाला स्पर्शून जात असते. कारण मी स्वतः बनविलेली भेटकार्ड कुणाला ना कुणाला आनंदाचा निरोप देणार असते. ते भेटकार्ड ज्याच्या हातात पडेल, त्याला ते आनंदी करणार याची खात्री असते. भेटकार्डच्या कलेबरोबरच पाककला देखील मला व इतरांना आनंद देत असते. विविध पाककृती इतरांसाठी करताना व त्यांना खाऊ घालताना एक वेगळीच तृप्ती मिळत असते. दुसऱ्याला तृप्त केल्याचा आनंद खरे तर अवर्णनीय असतो. माझ्या पाककलेने मला अनेक चांगले अभिप्राय मिळवून मला पाककलेत नवनवीन प्रयोग करण्यास उद्युक्त केले आहे. मेंदीने बनविलेली भेटकार्ड सर्वांनाच मेंदीतील सुखद थंडावा देऊन उत्साहित करीत असतात.
माझ्या कलेतून मी दुसऱ्यांना आनंद देऊ शकते. याचे मला नेहमीच समाधान वाटत असते. याउलट साहित्याचे आहे. माझे साहित्य मलाच अस्वस्थ करून सोडते तर इतरांचे काय? कदाचित साहित्याचा संबंध हा विचारांशी अधिक येतो. तर कलेचा संबंध आनंदाशी अधिक येत असावा.
साहित्याने विचार करण्यास प्रवृत्त करून अस्वस्थता दिली तर कलेने एक सुखद तृप्ती देऊन निर्मळ आनंद दिला. साहित्य आणि कला यांनी जीवनाचा समतोल साधला जाऊन जीवनाची खरी गोडी चाखायला मिळून समाधानी आयुष्य जगता आले आणि जगत आहे आणि जगत राहणार. (हा लेख २००४ च्या 'आयुष्याचं प्रतिबिंब' या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.)
©ज्योत्स्ना पाटील.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.