आईच्या वरणासारखे नव्हेच!
आईच्या वरणासारखे नव्हेच!
माझी लेक गावाहून आली की तिची पहिली फर्माईश असते, "आई, आजी करते तसंच गोड आंबट वरण बनव." तिच्या या फर्माईशला माझ्याकडे एकच उत्तर असते, "आजीला फोन करून सांग, आजी मी आली आहे." मी असे सांगताच बेटी म्हणते कशी, "का गं, तू आजीची मुलगी असून आजीला स्वयंपाक करण्याचा त्रास देतेस." यावर आमची दोघींची खडाजंगी सुरू होते, "तू माझी मुलगी असून मला त्रास दिलेला चालतो नि मी तुला फक्त आजीला फोन करायला सांगताच मला लेक्चर देत बसलीस." "वा! वा! तुला सगळे ठाऊक आहे. आजीला मी आली आहे असे सांगताच, आजी माझ्यासाठी गोड आंबट वरण तयार ठेवेल आणि तू मात्र आई असून माझ्यासाठी गोड आंबट वरण न करताच आजीकडे पाठवून मोकळी होतेस." असा हा संवाद नेहमीच होत राहतो कारण मला चांगले ठाऊक आहे की आई बनविते तसे गोड आंबट वरण बनविणे मला या जन्मी तरी शक्य नाही. आईच्या हातचे गोड आंबट वरण ज्या व्यक्तीने खाल्ले असेल ती व्यक्ती त्या वरणाची चव विसरणे शक्यच नाही. कितीही वर्षांनी या व्यक्ती भेटल्या तर पहिले वाक्य असते, " आक्कांच्या हातचे वरण खाल्ल्यानंतर तशा चवीचे वरण कुठेच खायला मिळाले नाही." आजीच्या हातच्या वरणाची चव चाखलेल्या लेकीला गोड आंबट वरण बनविण्याच्या फंदात न पडता मी सरळ तिला आईकडे पिटाळीत असते. आणि नातीला गरमागरम वरणभात तोही साजूक तूप घालून खाऊ घालण्यात आजीला जी धन्यता वाटते त्याविषयी विचारायलाच नको.
माझ्या आईने नातवंडांना भाजी कोणती करू?असे विचारताच सर्व नातवंडं एका तालासुरात ओरडतात, "आजी तुझ्या हातचे गोड आंबट वरण असताना कोणतीही भाजी चालेल."
असे हे आईच्या हातचे वरण आमच्या मुलांना कोणतीही भाजी खाण्यास उदयुक्त करीत असते कारण पोटभर वरणभात खायचा असल्यामुळे फक्त एकच पोळी खायची तर मग कोणती का भाजी असेना. असे हे आमच्या मुलांचे आजीच्या वरणाशी असलेले समीकरण सदा सर्वकाळी फिट्ट असते.
आम्हां तिघी बहिणींच्या घरी आईच्या वरणाची एक तऱ्हा तर याउलट आईच्या मैत्रिणीकडे मात्र वेगळीच तऱ्हा. आईच्या मैत्रिणीची सून मनिषा तिच्या सासूबाईंना म्हणाली, " आई, तुम्ही तुमच्या मुलांना मूगाच्या डाळीचे साधे वरण खायची सवय का लावली नाही? आपल्याला दररोज दोन प्रकारचे वरण करावे लागते आणि मला त्याचा कंटाळा येतो." मनिषाच्या प्रश्नाचे आणि तिच्या कंटाळ्याचे तिच्या सासूबाईंना हसूच आले. कारण पन्नास वर्षांच्या अनुभवांनी त्यांनाही त्यांची स्वतःची मते अनेकवेळा बदलावी लागली होती. त्यांच्या स्वतःच्या नवऱ्याच्या आवडीनिवडींविषयीही त्यांचे मत मनिषाच्या मतासारखेच होते. ' मुलांना खाण्यापिण्याच्या योग्य सवयी लावणे हे आईवरच अवलंबून असते.' हा पूर्वापार विचार आई झाल्यावर जसाच्या तसा स्विकारणे कदापिही शक्य नसते, हे अनुभवान्ती मनिषाच्या सासूबाईंच्या लक्षात आले होते त्यामुळे त्यांना मनिषाच्या प्रश्नाचे हसू आले.
मुलांच्या प्रत्येक कृतीबद्दल आईवडिलांनाच जबाबदार धरणे ही आमची मानसिकता बनून गेली आहे. 'माणूस' हा समाजप्रिय प्राणी आहे, हे सहजपणे विसरत असतो. मनिषाच्या प्रश्नाने तिच्या सासूबाई भूतकाळात रमून गेल्या आणि त्या मनिषाला म्हणाल्या, "तुझ्या नवऱ्याला गोड आंबट फोडणीचे वरण खायची सवय आमच्या शेजारी राहणाऱ्या आक्कांनी लावली आणि आक्कांच्या या वरणाने माझ्या पडत्या काळात खूप मोलाची मदत केली. पती निधनानंतर एकटीने संसार करताना खूपच तारेवरची कसरत करावी लागायची. सकाळी सात वाजताच नोकरीच्या ठिकाणी पोहचावे लागत असे त्यामुळे सकाळी भाजी चिरून स्वयंपाक करण्यात खूप वेळ जायचा तर कधी पैशांअभावी भाजी आणणे शक्य नसायचे. अशावेळेस मुलं म्हणायची, " "आई, गोड आंबट वरण कर , भाजी नाही केली तरी चालेल."
" मनिषा, आक्कांच्या या गोड आंबट वरणाने मला अनेक वर्षे साथ दिली. माझा वेळ व पैसा वाचला आणि मुलांना वरण पोळी मनापासून आवडत असल्यामुळे त्यांना बाहेरून खाद्यपदार्थ आणून खाण्याची वेळच आली नाही. आक्कांच्या वरणाने मला खूप साथ दिली. आता तू तुझ्या नवऱ्याला गोड आंबट फोडणीचे वरण करायचे की साधे वरण करायचे ते ठरव ." आईची मैत्रीण म्हणजेच सरोजिनी खैरनार आईला नेहमी म्हणत असते, " आक्का, तुम्ही माझ्या शेजारी राहत होत्या तेव्हा मी मुलाला बिनधास्तपणे तुमच्याकडे सोपवून जायची. तेव्हा तुम्ही मला मदत केली आणि आता आपण शेजारी राहत नसतानाही तुमचे वरण मला मदत करीत असते." असे हे आईचे गोड आंबट फोडणीचे वरण एका वेगळ्याच रूपात आईच्या मैत्रिणीमुळे साकारले.
आईच्या या वरणामुळे आमच्या शेजारी राहणाऱ्या शिरोडे वहिनी मात्र जाम वैतागाच्या कारण त्यांचे पती ( आमचे मानस बंधू )त्यांना दररोज त्यांच्याकडची भाजी घेऊन आमच्याकडे पाठवायचे आणि सांगायचे ," आपली भाजी देऊन आक्कांकडून वरण घेऊन ये. " आईच्या लक्षात आल्यावर आई वरण केल्याबरोबर वाटीभर वरण वहीनीकडे दयायला पाठवायची. हा सिलसिला अनेक वर्षे म्हणजे जोपर्यंत आम्ही वहिनींच्या शेजारी असेपर्यंत चालू होता. अशा अनेक गंमतीजंमती आईच्या वरणामुळे झालेल्या आहेत त्यामुळे लेकीने आजीच्या वरणासारखे वरण कर म्हणताच मी तिला सरळ आईकडे पिटाळते . माझी आई जर बाहेरगावी गेली असेल तर माझी बेटी म्हणते कशी, "आई, आज वरणभात करशील." तिने असे म्हणताच समजावे की बाईसाहेबांनी मामीला फोन केलेला दिसतो आणि आई गावाला गेली म्हणून मला हुकूम सोडलेला . माझ्याकडे आलेल्या पाहुण्यांनी " वरण छान झाले ." असे म्हणताच मी मनातच म्हणत असते,' पण माझ्या आईने बनविलेल्या वरणासारखे नव्हेच ....!'
वरण 😋😋😋😋
ReplyDeleteवरणभात खायला घरी ये. धन्यवाद।
Delete