एक मळभ
नुकतेच एका निबंध स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मिळाली. जवळ जवळ एक हजार निबंध तेही नाशिक शहरातील चौदा-पंधरा शाळांचे. या एक हजार निबंधांमध्ये मनाला भावणारा, मनापासून वाचावा असा एकही निबंध नसावा याचे आश्चर्य आणि खेदही वाटला.
शालेय जीवनात इयत्ता दुसरीपासून निबंध लिहायला देण्यामागचा अर्थ नेमका पालकांच्या व शिक्षकांच्या विस्मरणात गेला की काय अशी शंका आली.
'निबंध' लिहिणे म्हणजे विद्यार्थ्याच्या मनाचा खराखुरा आरसा होय. निबंधातून मुलांची आवड शिक्षकांना व पालकांना जाणून घेता येते. निबंधाच्या मांडणीतून विद्यार्थ्याचा कल कशात आहे हे ओळखून त्याला भविष्याच्या दृष्टीने दिशा दाखवण्याचे काम खरे तर शिक्षकांनी व पालकांनी करायचे असते. कल्पनेची भरारी म्हणजे निबंध. विचारांची बैठक म्हणजे निबंध. चिंतन मनन म्हणजे निबंध. एकाच गोष्टीकडे विविधांगांनी पाहणे म्हणजे निबंध. हे कुणाच्याच गावी नसावे याचेच आश्चर्य वाटले.
उदा. 'चंद्र' या विषयावर निबंध लिहायचे ठरवले तर प्रत्येक विद्यार्थ्याला कितीतरी वेगवेगळ्या कल्पना सुचू शकतात. कुणाला तो कोजागिरीचा चंद्र आठवेल नि त्यावर लिहील तर कुणी अमावास्येनंतरच्या वाढणाऱ्या चंद्रकलांवर लिहील तर कुणी नील आर्मस्ट्रांगवर लिहील तर कुणी चंद्रग्रहणावरच लिहील तर कुणी पौंर्णिमेच्या चांदण्या रात्री केलेली मुशाफिरीवर लिहील तर कुणी प्रियकर-प्रेयसीच्या मनातला चंद्र यावर लिहील तर कुणी चंद्रावर असलेल्या डागावरच एखादी कल्पित कथा लिहील.
चांदोबा चांदोबा भागलास का? म्हणत, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई. म्हणत, चाँद को क्या मालूम की चाहता हैं उसे कोई चकोर अशी सुरवात करीत किंवा मध्ये कुठेतरी काव्यपंक्ती पेरत निबंधाची मांडणी केली तर मुलांच्या मनातल्या खूप गोष्टी शिक्षकांना ओळखणे सहज सोपे जात असते.
परंतू एक हजार निबंध डोळ्याखालून घालताना या कोणत्याच गोष्टींचा मागमूसही लागला नाही याचेच वाईट वाटते.आज कॉपी पेस्टचा जमाना आहे हेच या निबंधांमधून जाणवले. निबंध म्हणजे कॉपी पेस्ट करणे होय. हेच आजच्या विद्यार्थ्यांना ठाऊक आहे आणि यात पालकांना व शिक्षकांनाही वावगे वाटत नाही. कॉपी पेस्टने आम्ही मुलांची विचारक्षमताच गोठवून टाकली. मुलांच्या कल्पना शक्तिला तर मारूनच टाकले. कदाचित ही सर्व मुले परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतीलही पण एक जबाबदार, सुजाण नागरिक बनतील की नाही हे मात्र सांगणे खरेच कठीण आहे.
असे हे पोरके, अनाथ, पंख कापलेले, बेजान निबंध कागदावर दिसत होते नि मन मात्र बेचैन झाले होते. विचारहीन, भावनाहीन, मूल्यविहीन पिढी घडवून वृद्धाश्रमांना खतपाणी घालण्याचे काम तर नकळत घडत नाही ना आमच्याकडून! भविष्यातील समाजाचे धूसर चित्र तर या कागदांमधून चितारले जात नाही ना!अशी शंकेची पाल मनात चुकचुकली.
विचार, भावना नसलेले निबंध मला ओसाड वाळवंटासारखे, यंत्रवत असलेली सजीव माणसे जणुकाही ढिम्म पुतळ्यासारखे भासू लागलीत. खूप काही हातातून निसटून गेल्यासारखे वाटत होते........! अनेक प्रश्नांचे काहूर माजले मनात.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.