About world book day

 योग्य हातात दिलेले पुस्तक 
           २३एप्रिल 'पुस्तक दिन' म्हणून सर्वत्र साजरा होत असताना मला मात्र  २२ मार्च २०१९चा दिवस आठवला नि मनात खूप कालवाकालव झाली. नियती कोणती गोष्ट आपल्याकडून नकळत करून घेईल ते सांगणे खरंच कठीण असते. २२ मार्चला मैत्रिणीच्या मुलीचे लग्न होते म्हणून आम्ही दोघे नवराबायको साक्रीला गेलो होतो. छायाच्या मुलीच्या लग्नाला जाण्यापूर्वी घरून निघताना अचानक लक्षात आले की, माझे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "अंतरंग सुगरणींची, खवय्येगिरी सर्वांची' हे पुस्तक साक्रीला राहणारे मोठे जेठ व जाऊबाई यांना देण्यासाठी घ्यायला हवे तर दुसरे मन म्हणत होते की, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल तेव्हाच रावसाहेबांना पुस्तक द्यावे. असे मनात चालले असतानाच पुस्तक बॅगेत टाकले. 
              छायाच्या मुलीचे लग्न आटोपताच आम्ही माझ्या जेठकडे म्हणजेच रावसाहेबांकडे गेलोत. रावसाहेबांच्या घरी गेल्यावर दीड-दोन तास गप्पा झाल्यात. गावाकडच्या शेतीपासून ते पुतण्याच्या लग्नाविषयी दोघा भावांच्या गप्पा चालल्या होत्या. आम्ही निघण्याची घाई करीत असताना ते म्हणाले, दोन-तीन दिवसात नाशिकला येतो. मी रावसाहेबांना व जाऊबाईला म्हणाले, "तुम्ही मंगळवारी लगेच या कदाचित आम्हांला वर्ध्याला जावे लागेल किंवा रावसाहेबांचे काही काम निघेल त्याच्या आत नाशिकला या तेही दोन-तीन दिवसांचा वेळ काढून." असे म्हणतच मी बॅगेतून पुस्तक काढले आणि माझ्या जाऊबाईंच्या हातात माझ्या नवीन पुस्तकाची प्रत देत असतानाच मी हसत हसतच म्हणाले, "माई, तुम्हांला मी का म्हणून पुस्तक द्यायचे? माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रावसाहेब येत असतात त्यामुळे मी त्यांनाच पुस्तक देईन." आणि असे म्हणत मी माईंना पुस्तक देण्याऐवजी रावसाहेबांना पुस्तक दिले नि त्यांचा आशीर्वाद घेतला. रावसाहेबांना पुस्तक देऊन आम्ही लगेच नाशिकला येण्यासाठी निघालो. 
              मंगळवारी नाशिकला रावसाहेब व जाऊबाई काही कारणास्तव येऊ शकले नाहीत नि आम्ही जाऊन आल्यानंतर वीसच दिवसात ती भयानक बातमी आली नि पायाखालची जमीनच सरकली. आमचे रावसाहेब या जगात नाहीत हे भयानक वास्तव स्विकारायला आजही मन तयार होत नाही. नातवाला सुटी लागली म्हणून पुण्याला त्याला घेण्यासाठी गेलेले आमचे रावसाहेब लेकीच्याच घरी शेवटचा निरोप घेऊन अनंतात विलिन झालेत. लेक, जावई व नातू यांना शेवटचे भेटण्यासाठीच गेलेत. 
                महत्त्वाची कामे सोडून माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला वेळातवेळ काढून हजर राहणारे रावसाहेब पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपल्याबरोबर जायची घाई करायचे. ते म्हणायचे, "ज्योत्स्ना, मला शहाद्याला अर्जंट जायचे आहे. तुझ्या कार्यक्रमासाठी मी कसातरी वेळ काढून आलो आहे. तू आपल्या घराण्याचे नाव मोठे केलेस याचा अभिमान वाटतो मला." त्यांचे कौतुकाचे शब्द, कधीच न पाहिलेल्या सासऱ्यांची उणीव भरून काढायचेत. त्यांच्या जाण्याने आम्ही काय गमावले ते शब्दात सांगणे शक्य नाही. आमच्या घराचा भक्कम आधारच निखळून पडला नि आपण पोरके झाल्याची जाणीव होऊन मन सैरभैर झाले आहे. 
                  आमचे रावसाहेब यावेळच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर राहू शकत नव्हते म्हणून तर २२ मार्चला मला पुस्तक घेऊन जाण्याची नि माईंच्या हातात पुस्तक देण्याऐवजी रावसाहेबांच्या हातात पुस्तक देण्याची बुद्धी देणारी नियतीला काय म्हणावे! खरंच कुठली तरी एक अनामिक शक्ती आपल्याकडून कार्य करून घेते तेव्हा वाटते आपण फक्त कळसूत्री बाहुले तर नाही ना! माणूस मात्र फुकाचा अहंकार बाळगत बसतो.....! हेच खरे. 
                  रावसाहेब, 
                  जाता जाता 
                  पुस्तक दिले 
                   तुम्हांला 
                   पण 
                   तुम्हीच 
                   खरे ज्ञान दिले 
                   आम्हांला 
                   जीवन क्षणभंगुर            
                   असल्याचे!  
रावसाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!                          

Comments

  1. Jyostna khup chan lekh!!! Khrey.....khup kahi sangun gelet rao saheb..... Jatana..

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद.

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या