विदेशी नहीं , इंडियन मँगता
दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . आम्ही सहकुटुंब सहपरिवार गोव्याला गेलो होतो . एके दिवशी आम्ही कलंगुट बीचवर फिरत असताना फिरून फिरून पाय थकलेत आणि पोटात कावळे ओरडू लागलेत म्हणून आम्ही बीचवरील एका हंगामी हॉटेलमध्ये गेलो . हंगामी हॉटेल म्हणजे गोव्याला बीचवर नोव्हेंबर ते मे या कालावधीत छोटे छोटे शेड उभारलेले असतात आणि त्या शेड्समध्ये भारतीय चटपटीत खाद्यपदार्थ मिळतात . आम्ही अशाच एका हॉटेलमध्ये गेलो . तेथे नाश्ता करीत असताना त्या हॉटेल चालकाशी गप्पा करीत असताना गप्पांच्या ओघात त्याला विचारले," या वर्षी बरेच पर्यटक आलेले दिसतात तुमचा धंदा तेजीत असेल ." यावर तो लागलीच उत्तरला ," नाही , पुढच्या महिन्यात येतील पर्यटक , तेव्हा आमचा धंदा तेजीत राहील ." त्याचे उत्तर ऐकून आम्ही स्तंभितच झालो . आम्ही त्याला म्हणालो , "विदेशी पर्यटक तर खूप आलेले दिसतात . "आमच्या या वक्तव्यावर तो पटकन म्हणाला , "हमको विदेशी नही , इंडियन मंगता . "त्याचे उत्तर ऐकून आम्ही चकीतच झालो . विदेशी पर्यटक खूप प्रमाणात बीचवर दिसत होते . बीचवर जिकडे तिकडे पर्यटकांची गर्दी असूनही हा असे का म्हणाला ? असा प्रश्न आम्हांला पडला .
चार पाच वर्षे मेमध्ये गोव्याच्या बीचवर फिरताना नेहमीच ' हमको विदेशी नही, इंडियन मंगता ' म्हणणाऱ्या हॉटेल मालकाची आठवण यायची आणि चार पाच वर्षाच्या अनुभवाने एक गोष्ट लक्षात आली की विदेशी पर्यटकांचे पंचतारांकित हॉटेलचे package असल्यामुळे ते या छोटया छोटया हॉटेल्समधून साधी मिनरल वॉटरची बाटली देखील खरेदी करीत नाहीत त्यामुळे बीचवरील छोटया हॉटेल चालकांना बीचवर फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांची गर्दीच अधिक आवडते तर याउलट भारतीय पर्यटकांना बीचवर अधिकाधिक विदेशी ललनांची गर्दी असावी असे वाटते . पंचतारांकित हॉटेल चालकांना विदेशी पर्यटक हवे असतात . असे हे गर्दीचे गणित प्रत्येकाचे वेगवेगळे असते . येथे माझ्या शाळेत शिकलेल्या गणिताचे काहीच काम नव्हते . कारण जीवनाचे गणित प्रत्येकाचे वेगळे असते . 'हमको विदेशी नही , इंडियन मंगता .' हे वाक्य जेव्हा जेव्हा गोव्याला गेलो तेव्हा हमखास आठवायचे . आजही कुणी गोव्याचे नाव काढले तर हे वाक्य आणि हॉटेल चालक यांची हमखास आठवण येत असते .
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.