अनमोल नाती

अनमोल नाती 
       ६ मे २०१८ला माझ्या मुलाचे लग्न झाले आणि माझ्या लहान दोघी बहिणींची मुलं नि माझ्या नणंदेचा मुलगा हे तिघेही आपापल्या आईला म्हणाले, "आता वहिनी आली मग आम्ही दादाकडे कसे जायचे?" 
             या माझ्या तिघा भाच्यांचा प्रश्न ऐकून त्यांच्या आयांना गंमतच वाटली. त्या तिघींनी मुलांना सांगितले, "दादा, ताऊ असताना तुम्ही दादाच्या रूमवर जायचे ना! मग वहिनी आली तर रूम बदलली का? दादा बदलला का?" माझ्या बहिणींनी व नणंदेने मुलांना सांगितले,"वहिनी आली तर तुम्ही आनंदाने दादाकडे जायचे. वहिनीच्या हातचे गरमागरम जेवण मिळेल नि वहिनीला चिडवायला मजा येईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शनिवारी, रविवारी वहिनीकडे जायचे. तुम्ही गेलात तरच वहिनीला ओळख होईल आणि तुमचे नाते घट्ट होईल."
                मधल्या बहिणीचा मुलगा विनू(विनीत), लहान बहिणीचा मुलगा अभी(अभिषेक) आणि लहान नणंदेचा मुलगा दादू(दिप्तेश) हे तिघेही पुण्याला हॉस्टेलवर राहत होते त्यामुळे ते तिघेही माझा मुलगा चि. स्वप्निल व मुलगी चि. पूर्तीच्या रूमवर शनिवारी रविवारी यायचे नि सगळे मिळून धमाल करायचेत. दोन वर्षे ते सगळे मिळून शनिवार रविवारी एकत्रित जमायचे. त्यानंतर चि. स्वप्नीलचे लग्न झाले आणि आता रूमवर कसे काय जायचे? असा प्रश्न माझ्या तिघा भाच्यांना पडला तेव्हा मी माझ्या सुनेला दीपश्रीला सांगितले, "तुझे तिघे दीर म्हणतात की, स्वप्नीलदादाचे लग्न झाले तर आता त्याच्या रूमवर कसे जाणार! असे म्हणत आहेत." यावर ती जोरजोरात हसायला लागली, "आई, मी आल्यावर रूमवर न यायला काय झाले!" मग मी दीपश्रीला सांगितले, "आता पुढच्या शुक्रवारी फोन करून तिघांना घरी बोलावून घे." मी सांगितल्यानुसार दीपश्रीने शुक्रवार येताच विनित, अभिषेक व दिप्तेशला फोन करून जेवायला व राहायला बोलावले. सुरवातीला वहिनीशी बोलायला लाजणारे तिघेही नंतर मात्र वहिनीशी तासनतास गप्पा करू लागलेत. वनबीएचकेच्या फ्लॅटमध्ये सहाजण दर शनिवार रविवारी धमाल करू लागलेत. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र अशी त्यांची दिनचर्या असायची. शुक्रवारी रात्री सगळ्यांनी आम्हांला तंबी दिलेली असायची सकाळी आठ वाजता फोन करून आमची झोपमोड करायची नाही. 
                आजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत पाच दिवस मुले मानपाठ एक करून आठ आठ तास काम करीत असतात तेव्हा त्यांना शनिवार रविवार या दोन्ही दिवशी निवांतपणे मनोरंजन, झोपणे व आवडेल ते खाणे या गोष्टी करू दिल्यात की, ती पुन्हा पाच दिवस जीवनाच्या लढाईला सक्षम राहतात म्हणून आम्हीही त्यांना शनिवार रविवार दोन दिवस फोन करण्याऐवजी त्यांच्याच फोनची वाट पाहायचो. शनिवार रविवारी त्यांनी सगळ्यांनी मिळून कशी धमाल केली याचे रसभरीत वर्णन प्रत्येकजण आपापल्यापरीने सांगायचे तेव्हा मला माझा भूतकाळ आठवायचा कारण वनबीएचकेच्या फ्लॅटमध्ये माझ्याकडेही नेहमीच पाहुण्यांची व मुलांची  वर्दळ असायची आणि माझ्या सुनेकडेही मुलांची वर्दळ पाहून मला खूप आनंद वाटायचा. आपलाच कित्ता सुनेने गिरवावा यापेक्षा दुसरे भाग्य ते काय असणार! 
            आज मात्र स्वप्नील व दीपश्री दोघेही स्वीडनला गेलेत तेव्हा त्यांनाही शनिवार रविवार येताच पुण्यातील रुमवरचे दिवस आठवतात आणि काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटते पण योगायोगाने त्यांना तेथे सुमित, भाग्यश्री व त्यांची लहानगी श्रीजा भेटलीत नि त्यांच्यासोबत काही अंशी का होईना त्यांचे एकाकीपण दूर होत असते त्यामुळे सुमित, भाग्यश्री व श्रीजाला खरे तर धन्यवादच द्यायला हवेत. आज मुलांना चांगले नातलग व मित्र मिळणे हेच खरे भाग्य होय. पैसा जगातल्या सगळ्या सुखसोयी देऊ शकतो पण मानसिक समाधान, शांती आणि लाखमोलाचा आधार चांगले नातलग व मित्रमैत्रिणीच देऊ शकतात. याबाबतीत आमच्याइतकेच आमची मुलं सुदैवी आहेत, याचा आनंद वाटतो.                                                     

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या