Friendship

 मैत्री शिकवणारी आई 
          दोन घरांची जेव्हा एकच सामाईक भिंत असते तेव्हा त्या घरातील गृहिणी या एकतर पक्क्या मैत्रिणी असतात किंवा पक्क्या वैरीणी तरी असतात . अशाच ब्राम्हणगावसारख्या खेडयातील एकच सामाईक भिंत असलेल्या घरातील दोन गृहिणी या पक्क्या मैत्रिणी . या दोघींची बरीचशी कामे ही  एकत्रच होत असत . अगदी दररोजची धुणी भांडी करणे असो , धान्य निवडणे असो की भाजी निवडणे असो . आठवडयातले दोन दिवस शनिवार , रविवार म्हणजे या दोघींचे चक्क स्वातंत्र्य उपभोगण्याचे दिवस . कारण दोघींचे नवरे शनिवारची सकाळची शाळा आटोपून जे पसार व्हायचे ते रविवारी रात्री उशीराच उगवायचे त्यामुळे या दोघींच्या घरी शनिवार, रविवारी एकच चूल पेटायची . दोघीजणी एकत्रच स्वयंपाक करायच्या . दररोज वरण भात भाजी पोळी व भाकरी असा साग्रसंगीत स्वयंपाक करून दोघींना कंटाळा यायचा म्हणून या दोघी शनिवार रविवारी दुपारचा जेवणाचा बेत करायच्या आणि तो म्हणजे गरम गरम मसालेदार खिचडी आणि गरमागरम शिरा . आणि मला वाटते दररोजच्या रुटीनचा कंटाळा त्या शनिवार रविवारच्या या आगळ्यावेगळ्या बेतने घालवून त्या दोघी पुन्हा आपापल्या नवऱ्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा सांभाळायला पाच दिवस तयार राहायच्या . एखादया शनिवारी रविवारी जर एखादीचा नवरा बाहेरगावी गेला नाही तर मात्र या दोघींचा आठवडा फारच त्रासदायक जायचा . कारण शनिवार रविवार हे दोन दिवस त्यांना थोडीफार विश्रांती व मनसोक्त गप्पा करण्यासाठी आणि आम्हां मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी मिळायचा . इतरवेळी या दोघी त्यांच्या कामात दंग असायच्या आणि आम्ही आमची शाळा , अभ्यास व खेळ  यात दंग असायचो . या दोघी मैत्रिणींच्या गप्पा ऐकणे हा माझा आवडता छंद होता . त्यांच्या गप्पांमध्ये सर्व प्रकारचे विषय असत . दोघींनी सकाळच्या रेडिओवरच्या बातम्या ऐकलेल्या असत व इतर कार्यक्रमही ऐकलेला असायचा त्यामुळे त्या दोघी देशातील घडामोडी ,  चित्रपट, गाणी, गायक, बाबा आमटे, शरद जोशी, फुलनदेवी असे सर्व प्रकारचे विषय असत आणि त्याबरोबरच स्वतःच्या घरात घडलेले रामायण, महाभारत यावरही त्यांच्या गप्पा व्हायच्या . 
          या दोघी मैत्रिणींचा दिवसभरातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे नवरा व मुलांना शाळेत पाठवून दिल्यानंतर दुपारच्या उन्हात घराच्या मागच्या अंगणात पाट मांडून खुल्या आकाशाखाली समोर सदा हिरवेगार असणाऱ्या शेताच्या सोबतीने दोन्ही बदल्यातल्या पाण्याचा डुचमळणाऱ्या आवाजाचे संगीत नि वेगवेगळ्या भांड्यांच्या वाद्यावर चालणारे भांडी धुण्याचे काम म्हणजे सगळ्यात आनंददायी काम होय . त्यांचे हे काम संपल्यानंतर बादलीतल्या पाण्याचा अंगणात सडा टाकायचा आणि त्या मृद्गंधाने मोहीत होऊन दोघीजणी तेथेच बाहेर गप्पा करीत बसायच्या. त्यांच्या गप्पा चालू असतानाच सर्व गाव हुंदडून आलेली या दोघींची एक खास मैत्रीण यायची . ही मैत्रीण म्हणजे सुया दोऱ्या विकणारी वैदू जमातीतील ही स्री, सर्व गाव भटकून शेवटचा मुक्काम या दोघींजवळ ठोकायची, मग एकीने तिला भाजी दयायची आणि दुसरीने भाकरी, पोळी दयायची . . ती वैदू स्री इतकी हक्काने यायची की त्या दोघींनी तिला न मागताच भाजी पोळी दयावी . एखादया दिवशी भाजी नसली तर लोणचं, चटणी दिली जायची . त्या सुया दोऱ्या विकणाऱ्या स्रीला भाजी भाकरी देणाऱ्या या दोघी मैत्रिणी मला जगातल्या सगळ्यात श्रीमंत स्रिया वाटत असत . श्रीमंती पैश्यात नसते तर ती असते माणसाच्या संवेदनशीलतेत हा संस्कार या दोघी मैत्रिणींनी आम्हां मुलांवर केला. 
             आज शहरातल्या आधुनिक स्रियांची मैत्री पाहताना मला या दोघी मैत्रिणी आठवतात. त्यांची मैत्री काल, आज आणि उद्याही तितकीच घट्ट होती, आहे आणि राहील यात शंकाच नाही . याउलट आजच्या उच्चशिक्षित, आधुनिक स्रियांची मैत्री पाहताना काहीतरी निसटल्यासारखे वाटते. काळानुसार मैत्रीचे संदर्भदेखील बदलत गेले . या दोघी मैत्रिणी म्हणजे माझी आई शालिनी पाटील आणि सरोजिनी खैरनार होत. या दोघी मैत्रिणींनी जीवनातील सुख दुःख वाटून घेतलीत त्यामुळेच त्यांना जगण्याच  बळ मिळत गेले . मैत्री म्हणजे काय ? हे या दोघींना नेमके कळले होते. मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री म्हणजे निरपेक्ष प्रेम, मैत्री म्हणजे तू नि मी च्या पलीकडच जग. या दोघी मैत्रिणींनी संकटकाळी एकमेकीला सावरण्याचे काम नेहमीच केले. मैत्री म्हणजे खऱ्या अर्थाने समुपदेशन व मार्गदर्शन करणारे बिना फीचे केंद्र होय , हेच त्या दोघींच्या मैत्रीतून जाणवले. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ हा भाव जेथे गळून पडतो तेथेच खरी मैत्री वसत असते नि बहरतही असते. त्या दोघींच्या मैत्रीला माझा सलाम. 

(माझी एक बाल मैत्रीण परीक्षा असताना ब्लॉग वाचत होती हे लक्षात आले असता बऱ्याच दिवसांपासून ब्लॉगवर पोस्ट टाकली नाही म्हणून आजचा हा मैत्रीचा लेख खास माझ्या या बारावीत शिकणाऱ्या श्रावणी घुले या बाल मैत्रिणीसाठी.) 

Comments

  1. मैत्रीला मैत्रिणीला व लेखिकेला मनापासून सलाम

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या