Housewife
आहे ना मग गंमत गृहिणी पदाची!
पंधरा दिवसांपूर्वी डॉ. प्रतिभा जाधव यांचा फोन आला, "मॅडम, आपल्याला १७ मार्च २०१९ ला 'अभिव्यक्ती महिला साहित्य संमेलनाची' मिटींग घ्यायची आहे." तेव्हा मी प्रतिभा मॅडमला म्हणाले, "मॅडम, मी १७ तारखेला नाशिकला असेल की वर्ध्याला हे मला आत्ता तरी सांगता येणे शक्य नाही पण नाशिकला असले तर मी मीटिंगसाठी नक्कीच येईन." असे सांगून फोन ठेवला. त्यानंतर आमची व्हाटसऍपद्वारे संदेशांची देवाणघेवाण चालू होती आणि योगायोगाने १७ तारखेला म्हणजेच आज मी नाशकात असल्यामुळे आज सकाळीच मिटींगला जाण्यासाठी तयारी करू लागले. सकाळी उठल्याबरोबर माझ्या घरापासून एक कि. मी. अंतरावर राहणाऱ्या स्वाती पाचपांडे या मैत्रिणीला फोन केला की, आपण दोघी दहा वाजता नाशिकरोडला मिटिंगसाठी बरोबर जाऊ या. तिला फोन करून मी माझ्या नवऱ्यासाठी व सासूबाईंसाठी स्वयंपाक करण्याच्या तयारीला लागणार तितक्यात मोबाईल वाजला, पलिकडून एक अनोळखी स्त्री बोलत होती, "तुमच्या एका नातलगाची तब्येत ठीक नाही ते तुमच्याशी बोलत आहेत." मी त्या आजारी असलेल्या नातलग स्त्रीची समजूत घातली आणि सांगितले, "मी तुमच्यासोबत कुणालातरी पाठवते." ज्या स्त्रीने मला फोन केला होता तिचे आभार मानून फोन ठेवला आणि त्या आजारी स्त्रीच्या लेकीला फोन करून तिच्या आईकडे पाठवले. या सगळ्या गडबडीत गोविंदनगरला माझ्या पतीचे मावसभाऊ पॅनिशिया या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्यामुळे मला तिकडे जाणे शक्य झाले नाही. अशा सगळ्या गडबडीत स्वयंपाक करणे, नाश्ता बनवणे, फोन घेणे, फोन करणे, कामवालीला कामे सांगणे, नवऱ्याला, सासूबाईला नाश्ता देऊन औषधाच्या गोळ्या देऊन स्वतःची तयारी करून दहा वाजता घराबाहेर पडले नि दहा चाळीसला मिटिंगचे ठिकाण गाठले तेव्हा कुठे हुश्श केले नि मनात विचार येऊन गेलेत की, सगळ्यांना वाटते काय घरीच तर असतेस. काय काम असते. सकाळी ज्या स्त्रीने फोन केला असेल तिला वाटले असणार, "कसे नातलग आहेत बघा." आता आम्ही कुणाला, केव्हा, कुठे, कशी मदत केली हे त्या तिऱ्हाईत व्यक्तीला ठाऊक नसेन. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या नातलगांना मी गृहिणी आहे एवढेच माहीत असल्यामुळे मी मिटींगला गेली ही कदाचित सबबही वाटू शकते. मी मिटींगला गेल्यानंतर माझ्याकडे पाहुणे आलेत आणि हे पाहुणे जर मी मिटींगला जाण्यापूर्वी आले असते तर मी आजच्या मिटींगला जाऊ शकले नसते तेव्हा काही मैत्रिणींना कदाचित तो मिटींगला न येण्याचा बहाणा वाटला असता. त्यातच स्विडनला असलेल्या लेकाला वाटते आईने फोन पण नाही केला. पुण्याला असलेल्या लेकीलाही तसेच वाटते आई घरीच तर असते तरी फोन करत नाही. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून एकाच शहरात राहूनही आईवडिलांची ख्यालीखुशाली विचारण्यास वेळ मिळत नाही तेव्हा स्वतःला अपराधी वाटून हात मोबाईलकडे जातो. आहे ना मग गंमत गृहिणीची!
मसत बाई
ReplyDeleteDhanyavad!
Delete