आठवणीतील पोहे

आजचा लेख आईची मैत्रिण श्रीमती वत्सलाबाई ठाकरे यांच्यासाठी. वत्सलाबाई या नेपाळ, चेतवन व पोखरा ट्रीपला गेल्या असून त्यांना हा लेख वाचता यावा म्हणून खास त्यांच्यासाठी व त्यांच्या मैत्रिणींसाठी. बाई, खूप धमाल करा नि तुमच्या जुन्या मैत्रीणींबरोबरचे धमाल क्षण आठवून भरपूर हसा.      

आठवणीतील  पोहे 

             इ. स. १९९४ साली दिलिप यांनी मनमाडची नोकरी सोडून दिंडोरी येथे रूजू झाले होते त्यामुळे मनमाडचे घर सोडून आम्ही दिंडोरीला येण्याचा दिवस निश्चित झाला. आम्ही मनमाड सोडून दिंडोरीला जाणार म्हणून नांदापूरकर वहिनी व त्यांची जाऊ या दोघीजणी भेटायला आल्या. दोघींशी मनसोक्त गप्पा केल्या. माझ्या मुलाचा व मुलीचा त्या दोघींना चांगलाच लळा लागला होता. कोणतेही घर सोडताना शेजाऱ्यांशी दुरावण्याचे दुःख हे होतच असते. मला व दोघी नागपूरकर वहिनींना दुरावण्याचे दुःख होतेच. मनमाडचे घर सोडण्याच्या आदल्या दिवशी नांदापूरकर वहिनींनी आम्हांला सर्वांना नाश्त्यासाठी बोलावले. वहिनींनी नाश्त्यासाठी पोहे केले परंतु त्या पोह्यांमध्ये काय नव्हते! नांदापूरकर जावांनी केलेल्या पोह्यांमध्ये प्रेम, आपुलकी व मायेचा ओलावा असे सर्वकाही मिळाले होते. नांदापूरकर जावांनी बनविलेल्या त्या पोह्यांची चव वीस वर्षानंतरही मी विसरू शकले नाही. 
            नांदापूरकर वहिनींनी पोहे व्यवस्थितरित्या भिजवून कांदे, मिरची चांगले तळून व खरपूस अशा शेंगदाण्यांनी पोहे बनविले आणि त्यानंतर प्लेटभरून गरमागरम पोहे आम्हांला दिलेत तेव्हा मी क्षणभर पोह्याच्या डिशकडेच पाहत राहिले. काश! त्याकाळी माझ्याकडे मोबाईल असता तर मी त्या डिशचा फोटो काढून ती डीश कायमची माझ्या मोबाईलमध्ये बंदिस्त करून ठेवली असती. नांदापूरकर वहिनींनी पिवळ्या रंगाच्या पोह्यांवर खरपूस तळलेले लालसर शेंगदाणे पसरविले होते त्यानंतर तिसरा थर हिरव्यागार मटाराच्या दाण्यांचा होता. मटाराच्या दाण्यांनंतर काळ्या पांढऱ्या रंगाचा खोबऱ्याचा कीस व त्यावर लसलशीत कोथिंबीरीचा हिरवा गर्द मुकूट चढविला होता आणि सोबत रसरशीत लिंबाच्या फोडीचा पाणीदारपणा पाहून प्रेमाच्या माणसांसाठी झटून बनविलेले नांदापूरकर वहिनींचे पोहे हे कधीच विस्मरणात जाऊ शकत नाहीत. मनापासून व प्रेमाने केलेल्या पदार्थाची चव ही कुठल्याच शब्दांत सांगणे शक्य नसते तर त्यासाठी त्या पदार्थाचा आस्वाद घेणेच महत्त्वाचे असते. 
               पंचवीस वर्षात नांदापूरकर वहिनी भेटल्या नाहीत परंतु दरवेळेस पोहे करताना नांदापूरकर वहिनी व त्यांची जाऊ या दोघींची आठवण येत असते. 
                नांदापूरकर वहिनींच्या पोह्यांबरोबर इतरही अनेक आठवणी जाग्या होत असतात. पस्तीस वर्षापूर्वी स्वयंपाकात हिरवी मिरची घालून पदार्थ बनविण्याची फारशी पद्धत नव्हती तेव्हा माझी मैत्रीण निलीमा तिच्या आईला सांगायची, "आई, हिरवी मिरची घालूनच पोहे कर नाहीतर मी खाणार नाही." यावर तिची आई म्हणायची, "आजकाल हिरवी मिरची घालून प्रत्येक पदार्थ करण्याची तर फॅशनच झाली आहे." मग आम्ही त्यांच्या या वाक्यावर चांगलेच हसायचो नि मैत्रिणीच्या आईला म्हणायचो," माई, आम्ही कपड्यांची व केसांची फॅशनविषयी ऐकले होते परंतु खाद्यपदार्थांची फॅशन तुमच्याच तोंडून ऐकत आहोत." असा हा हिरव्या मिरची घालून पोह्यांचा संवाद निलिमाच्या घरी रंगायचा अर्थात माईच्या हातच्या चविष्ट पोह्यांवर ताव मारीतच. माझ्या मैत्रिणीची पोह्यांची ही तऱ्हा तर याउलट आज सर्वत्र हिरवी मिरची घालून पोहे केले जात असताना माझी बेटी मला दम देते,"नाश्त्याला पोहे करणार असशील तर लाल तिखट घालूनच कर नाहीतर मी खाणार नाही." तिचा हा दम मला मैत्रिणीने तिच्या आईला दिलेल्या दमची आठवण करून देत असतो. तीही तिच्या आईला असाच दम द्यायची. 
             माझ्या आईच्या मैत्रिणीचे तर पोह्यांशी चांगलेच मेतकूट होते. ब्राम्हणगावाला असताना वत्सला ठाकरे या पाटावर कपडे धुवायला जाण्यापूर्वी आमच्या अंगणातून आईला आवाज द्यायच्या आणि दम द्यायच्या,"पाटील बाई, मी पाटवरतीन (कालवा) कपडा धुयीसन येस, पोहे करी ठेवा." आईची मैत्रीण कपडे धुऊन आली की मग आमच्या शेजारी राहणाऱ्या सरोजिनी खैरनार, आई व ठाकरेबाई या तिघींचे त्रिकूट गप्पा करीत पोहे खाणे व चहा पिणे असा तासभर कार्यक्रम करायच्या. या तिघींची पोहे व चहाची पार्टी दररोज रंगायची ती सकाळी नऊ ते दहा यावेळेत. आज संध्याकाळी पार्टी करणारे माणसांचे कळप पाहिले की, मला या तिघींची सकाळच्या वेळी होणारी पार्टी हमखास आठवते. आईला व तिच्या मैत्रिणींना जोडून ठेवणारा दुवा असणारे पोहे मला नेहमीच भूतकाळात डोकावण्यास भाग पाडीत असतात आणि मानवी नातेसंबंधाचे गणितही उलगडून दाखवीत असतात. 
               पोह्यांबरोबर लोणचे खातात याचा शोध मला दीपा वाखारकर या मैत्रिणीच्या घरी पोहे खाल्ल्यावर लागला होता.पोह्यांशी निगडित अशा अनेक गोष्टी मानवी नातेसंबंधातील सौंदर्य उलगडून दाखवीत असतात.  

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या