व्हॉटसअपवरील विहिरीच्या शोधा  

ऑक्टोबर २०१५ ला आम्ही कास पठार येथे गेलो आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनीच व्हॉटसअपवर साताऱ्याजवळील शिवकालीन विहिरीविषयी माहिती व विहिरीचे फोटो आलेत आणि ते पाहून मनाला सारखी चुटपूट लागून राहिली की विहिरीविषयीची माहिती दोन दिवस अगोदर आली असती तर नक्कीच आपण ती विहीर पाहायला गेलो असतो . बरेच दिवस व्हॉटसअपवरच्या विहिरीने मनात घर केले होते आणि योगायोगाने २४ जून २०१६ ला कोल्हापूरहून पुण्याकडे येताना साताऱ्याचा फलक दिसताच  व्हॉटसअपवरची विहीर मनात लख्खकन झळकली आणि पती महाशयांना सांगितले , " आपल्याला साताऱ्याजवळची विहीर पाहायला जायचे आहे . " मी असे म्हणताच , " ती विहीर कोठे आहे ? " आता आली का पंचाईत ! वर्षभरापूर्वीच्या   व्हॉटसअपवरच्या  मेसेजमधील सगळं काही आठवत होते परंतु त्या ठिकाणाचे नाव मात्र काही केल्या आठवेना . ज्यांना ज्यांना मी तो संदेश पुढे पाठवला होता त्या सर्वांना फोन करून विचारले की , " साताऱ्याजवळील शिवकालीन विहीर असलेले ठिकाण नेमके कोठे आहे ? " सगळ्यांनी माहीत नाही असे सांगताच , मी माझ्याच भ्रमणध्वनीमधील मोजकेच संदेश पाठवलेल्या नंबरचे अकाउंट उघडून मागील एका वर्षापूर्वीचे संदेश पाहीले असता मला जे हवे होते ते ठिकाण सापडले आणि अलिबाबाची गुहा उघडल्यासारखा आनंद झाला . मला हवे असलेले ठिकाण होते सातारा - पुणे महामार्गावरील भुईंज या गावापासून जवळ असलेले शेरीलिंब गांव . साताऱ्यालाच दोघा तिघांना शेरीलिंब गांव विचारल्यावर तेथील नागरिक म्हणाले , " तुम्ही म्हणतात ती विहीर लिंबगाव येथे आहे . " शेवटी लिंबगाव विचारत विचारत आम्ही चतुरबेट येथे आलो असता तेथील एक नागरिक म्हणाला , " तुम्ही म्हणतात ती विहीर ' बारामोटेची विहीर ' आहे , येथून जवळच आहे . पुढे गेल्यावर बोर्ड दिसेलच . " विहिरीच्या शोधात निघालोत पण तीच विहीर आहे की नाही अशी शंका येत  होती परंतु जर विहिरीच्या नावाने फलक आहे म्हणजे तीच प्रसिध्द विहीर असावी याची खात्री पटली आणि पाच मिनिटांतच आम्ही शेरीलिंब गावाजवळच्या त्या प्रसिध्द विहिरीजवळ येऊन पोहचलो आणि क्षणभर मनात विचार येऊन गेला की ,  आपण जी विहीर शोधत होतो ती ही नसावी  परंतु विहिरीजवळ पोहचल्यावर समोरची विहीर पाहून मन उचंबळून आले . खरंच विहीरसुध्दां किती कलात्मकतेने बांधली आमच्या पूर्वजांनी !   
                 पूर्वीच्या काळी महालांना जशा कमानी असत तशाच कमानी विहिरीवर बांधलेल्या  छोटयाशा  खोलीला केल्यामुळे ती खोली म्हणजे विहिरीवरील ' मिनी राजमहालच ' होय असे वाटते . विहिरीत असलेल्या पाण्याच्या पातळीवरून तिला ' बारामोटेची विहीर ' हे नाव किती सार्थ होय याची खात्री पटते . 
               व्हॉटसअपवर  या विहिरीची जी पाच सहा छायाचित्रे आली होती त्यातील दोनच छायाचित्रे या  विहिरीची होती व इतर छायाचित्रे  ही कदाचित राजस्थानमधील विहिरींची असावीत असे ती विहीर प्रत्यक्षात पाहिल्यावर लक्षात आले त्यामुळे कुणीही या विहिरीला भेट देताना  व्हॉटसअपवरच्या विहिरीच्या प्रतिमा गृहीत धरून न जाण्यातच शहाणपण आहे नाहीतर हिरमोड व्हायचा . ज्यांना वास्तूशास्रात रूची आहे त्यांनी मात्र या विहिरीला अवश्य भेट द्यावी कारण पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे प्रत्येक वाड्यात विहीर  किंवा घरात आड असायचे त्याचप्रमाणे भविष्यात सोसायट्यांमध्ये बोअरऐवजी लोकं विहिरीची मागणी करायचे तेव्हा ही बारामोटेची विहीर कामी यायची , त्यामुळे ही विहीर पाहिल्यावर जुन्या नव्याचा संगम करीत एक नवीन कलात्मक विहीर फार्म हाऊस किंवा मोठ्या सोसायटीत एखादा बांधकाम व्यावसायिक नक्कीच बांधेल  . काळ्या दगडातील भक्कम बांधकाम असलेली ही ' बारामोटेची विहीर ' म्हणजे आमच्या पूर्वजांनी ठेवलेला ऐतिहासिक वारसा होय आणि त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे काम आहे . तेथील गावकऱ्यांनी या विहिरीची संपूर्ण माहिती लिहिलेला फलक तेथे लावावा व सातारा महामार्गावर जेथे वळायचे आहे तेथेही मोठ्या अक्षरात ' बारामोटेची  विहीर ' असे लिहिलेला सूचना फलक जरूर लावावा म्हणजे पर्यटकांना व इतर नागरिकांना सोयीचे होईल . 
                विहीर पाहून झाल्यावर तेथील दोन शेतकरी महिला आमच्याजवळ आल्यात व त्यांनी त्यांच्या शेतातील हळद दळून आणलेली होती आणि आम्हांला ती हळद घेण्याचा आग्रह करू लागताच आम्ही त्यांच्याकडून तीन किलो हळद विकत घेतली तसेच त्यांच्या शेतातील भाजीपाला व आंबे खरेदी करून पुढील प्रवासाला निघालो . आजूबाजूला हिरव्यागार शेतांच्या मध्यभागी असलेल्या बारामोटेच्या विहिरीने मनाला एक वेगळीच अनुभूती आली . 



Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या