Miramar beach in Goa

  गोवियन बीच - मीरामार 
                  ज्या मीरामार बीचच्या सप्तरंगी आठवणी होत्या त्याच मीरामार बीचच्या कालच्या आठवणींनी यापुढे एक कटू आठवणही स्मरणात राहील ती म्हणजे एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व कायमचे या बीचवर चिरनिद्रा घेत तेथील कणाकणात विलीन झाले. गोव्याचा लाल, भारताचा सुपुत्र मनोहर पर्रीकर यांचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. चौदा-पंधरा वर्षापूर्वीचा मीरामार बीच आणि कालचा टी. व्ही. वर पाहिलेला मीरामार बीचने दुःखाचा दिलेला झटका. एक सुसंस्कृत व्यक्ती जेव्हा हे जग सोडून जाते तेव्हा प्रत्येकालाच हळहळायला लावून जात असते आणि हीच गोष्ट पर्रीकरांच्या बाबतीत झाली. त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला नि राजकीय क्षेत्राची फार मोठी हानीही झाली. मनोहर पर्रीकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

          ' गोव्यातील मीरामार ' बीच हा पणजी शहराजवळ असल्यामुळे मीरामार बीचवर गोवियन वातावरण अनुभवता येत असते . गोव्यातील इतर बीचवर ज्याप्रमाणे विदेशी पर्यटकांनी कब्जा करून घेतलेला दिसतो तसा या बीचवर दिसत नाही . कदाचित शहराला लागून असलेला हा बीच स्थानिक लोकांच्या गर्दीमुळे खराखुरा गोवियन बीच होय असे मला वाटते . अनुनासिक हेल काढीत कोकणी बोलीभाषा कानांवर हलकेच येते तेव्हा आपण गोव्यात आहोत याची खरीखुरी जाणीव होत असते . मीरामार बीचवर समुद्राच्या लाटांशी हितगूज करायचे असेल तर बरीच रेती पायाखाली तुडवित जावे लागते . रेतीतून चालताना पायातील चप्पल किंवा बूट म्हणजे एक अडगळीची वस्तू वाटू लागते . अशावेळेस मात्र मी अनवाणी चालणेच पसंत करते . रेतीतून चालतांना चांगलीच कसरत करीत जावे लागत असले तरीदेखील रेतीचा तो मऊसूत स्पर्श एक सुखद अनुभूती देऊन जात असतो . या बीचवर बरीच रेती पायाखाली तुडवित गेले की मगच समुद्राच्या लाटांशी हितगूज करायला मिळत असते . हा बीच शहराच्या वस्तीला लागून असल्यामुळे येथे लहान मुलांसाठी घसरगुंडी , झोपाळे यासारखी खेळणी असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मनसोक्त खेळात येते . या बीचवर दूरपर्यंत रेतीच रेती पसरलेली असल्यामुळे रेतीवर लहान मोठे सर्वचजण चेंडू खेळण्याचा आनंद लुटत असतात . या बीचवर अनेक पर्यटकांना चेंडू खेळताना पाहिले आणि वाटले ' राष्ट्रीय खेळणी ' कोणती ? असे जर कुणी विचारले तर ती खेळणी म्हणजे ' चेंडूच ' होय . कारण स्त्री -पुरुष , लहान - मोठे , गरीब - श्रीमंत , धर्म - जात असा कोणताही भेद या खेळाला करता येत नाही . सर्वधर्मसमभाव शिकविणारा व जगाच्या पाठीवर सर्वत्र खेळला जाणारा खेळ म्हणजे चेंडू खेळणे होय . कारण या खेळाला ना नियमांचे बंधन , ना आखीव रेखीव मैदानाच्या सीमांचे बंधन ! असा हा मुक्त चेंडू आणि तसेच त्याच्याशी मुक्तपणे खेळणे . चेंडूच्या या स्वैरपणामुळेच तर बंधमुक्त व्यक्तिला आम्ही ' खुशालचेंडू 'अशी उपमा दिली असावी . या बीचवर दोन तीन वर्षाची दुडूदुडू धावणारी मुले हातात फुगा घेऊन रेतीतून पळताना धप्पकन खाली पडतात तेव्हा त्यांची उठण्याची धडपड अगदी बघण्यासारखी असते . एखाद्या बाळाला उठता नाही आले तर ते ओरडून आपल्या आईवडिलांचे लक्ष वेधून मला उठवा असे सूचित करीत असते . रेतीत खेळणारी मुले आणि त्यांच्या लीला पाहण्यात दंग असलेले मुलांचे आईवडील रेतीत पाय मोकळे करून आरामात बसलेले दिसतात . या बीचवर पणजीवासीयांचे प्राबल्य अधिक जाणवते . 
                    मीरामार बीचवर स्थानिक नागरिक , भारतीय व विदेशी पर्यटक असा तिहेरी जनसमुदाय एकत्रित असल्यामुळे भेळ , पाणीपुरी व इतर पदार्थ विकणाऱ्यांची गर्दीही खूप असते . सूर्य जसजसा अस्ताला जातो तसतशी खवय्यांची गर्दी या खाद्यपदार्थांच्या गाड्यांभोवती जमू लागते . आई - वडिलांना चमचमीत पदार्थ खायचे असतात तर त्यांच्या लेकरांना आईस्क्रीम हवे असते . 
                    रात्री आठ वाजेनंतर मीरामार बीचवर समुद्राचं संगीत ऐकत रेतीवर बसून राहणं हा एक आल्हाददायक अनुभव असतो . एकीकडे समुद्राच्या लाटांचा उंचच उंच वाढत जाणारा स्वर तर दुसरीकडे दिव्यांच्या झगमगाटात रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ . रस्त्याच्या कडेने दिव्यांसोबत रखवालदारी करणारी नारळाची उंचच उंच झाडे . जोडीला लाटांवर स्वार होऊन येणारा खारा वारा अंगाला झोंबताच आपसूक चौथीत असताना बाईंनी शिकवलेली बा . भ . बोरकरांच्या ओळी ओठांवर रूंजी घालत असतात , 
                     माझ्या गोव्याच्या भूमीत 
                     उन्हाळ्यात खारा वारा 
खरंच बोरकरांचे गोव्यावर किती प्रेम होते हे त्यांच्या कवितेतून दिसून येते . दीपस्तंभावरून येणारा दिव्याचा प्रकाशझोत आणि या सर्वांना साथ करणारे पौर्णिमेचे चांदणे असले तर विचारायलाच नको ! तासागणिक वाढणारी रात्र मीरामार बीचचा निरोप घेण्यास भाग पाडते तेव्हा वाटते मीरेची एकतारी ( समुदाची गाज ) झंकारत आहे आणि कृष्ण कन्हैया अधीर होऊन समुद्राची लाट बनून येत आहे ..... !     

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या