शालिन सौंदर्याचा नजारा - श्रीनगर
शालिन सौंदर्याचा नजारा - श्रीनगर
१९८९ साली केलेला काश्मिरचा प्रवास आजही तीस वर्षानंतर मन ताजंतवानं करीत असतो. श्रीनगरच्या लाल चौकातील पंजाब नॅशनल हॉटेलसमोरील काश्मिरी नागरिकांची चित्रपटाच्या तिकिटासाठी असलेली भली मोठी रांग पाहून आश्चर्य व्यक्त करीतच आम्ही तयारी करून नाश्ता करण्यासाठी हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये आलो तर सगळीकडे सरसोच्या तेलाचाच वास येत होता आणि मला त्या वासाने मळमळायला लागले त्यामुळे माझी भूकच पळाली . चहाबरोबर ब्रेड , बिस्कीट खाऊन आम्ही बाहेर पडलो . हॉटेल मालकाला पर्यटन स्थळांविषयी माहिती विचारून कसे जायचे याविषयी जाणून घेतले नि मग त्यानुसार आम्ही हॉटेलबाहेर पडलो. प्रथम आम्ही आमचा मोर्चा सर्वांच्या तोंडून ऐकलेल्या डलझीलकडे (दल सरोवर) वळवला . दल सरोवर म्हणजे अंगठीत बसवलेल्या हिऱ्याच्या खड्याप्रमाणे होय . आजूबाजूला टेकड्या आणि त्यामध्ये चमकणारे सरोवराचे पाणी म्हणजे अंगठीतला हिराच होय . या सरोवरात मध्यभागीच एक बगीचा आहे. या बगिच्याला नेहरू पार्क असे नाव देण्यात आले आहे . नेहरू पार्कला शिकाऱ्याने ( सुशोभित केलेली नाव ) जाताना एक वेगळाच आनंद वाटतो . पाण्यातून वाट काढीत जाणारा शिकारा आणि आजूबाजूने जाणारे इतर शिकारे , समोरच्या हिरव्यागार टेकड्या आणि विविधरंगी पोशाख केलेले देश विदेशातल्या नागरिकांचे जणूकाही संमेलनच भरले आहे असे वाटते . कितीतरी भाषांचे संवाद कानांवर पडत असतात अशा वेळेस वाटते जगभरातल्या सगळ्या भाषा बोलता आल्या असत्या तर किती मजा आली असती , काय काय ऐकायला मिळाले असते, असा विचार मनात येऊन माझे मलाच हसू आले . असे अनेक विचार मनात रेंगाळत असतानाच आम्ही नेहरू पार्कजवळ येऊन पोहचलो. नेहरू पार्कमध्ये फेरफटका मारताना 'काश्मीर की कली हूँ मै,' असे म्हणत शर्मिला टागोरची शिकाऱ्यातली अदा आठवली आणि काश्मीरच्या सौंदर्याची महतीही पटली . येथील निसर्गाने आमच्या हिंदी चित्रपट सृष्टीला का वेड लावले तेही कळले . आजच्या चित्रपटांमध्ये परदेशातील निसर्गसौंदर्याचे दर्शन होत असले तरीदेखील काश्मीरच्या निसर्गसौंदर्याला तोड नाही शेवटी आपल्या मातीचा सुगंध आपल्याला भुरळ घालतोच . नेहरू पार्कने ' काश्मीर की कली ' हा चित्रपट पुन्हा दाखवला . तीन तासाचा चित्रपट किती झर्रकन डोळ्यांसमोरून गेला आणि माणसाला मिळालेली स्मृतीची देणगी किती अजब आहे याचा प्रत्यय आला . दल सरोवराचे मनोहारी दृश्य पाहून आम्ही ' हार्वन गार्डन ' च्या रस्त्याला लागलो . हार्वन गार्डनमध्ये एक कृत्रिम झील असून झीलच्या बाजूला घनदाट झाडीचा पर्वत आहे आणि त्याचे प्रतिबिंब झिलच्या पाण्यात खूपच सुंदर दिसते . रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहताना मन इतके प्रसन्न होऊन जाते की मनात इतर कुठले विचार येतच नाहीत. हार्वन गार्डनचा निरोप घेऊन आम्ही शालिमार गार्डन पाहण्यासाठी गेलो . शालिमार गार्डनमध्ये बागेच्या मधून संथपणे पाणी वाहत असते. त्या पाण्यातच थुईथुई नाचणारे कारंजे पहिले की आपल्याला पुन्हा लहान व्हावेसे वाटते आणि त्या कारंजांचे पाणी अंगावर घेऊन मनसोक्त उड्या माराव्यात आणि चिखलाचे गोळे करून एकमेकांच्या अंगावर फेकून धमाल उडवून द्यावी असे वाटत होते . ओळीत स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे असलेले वृक्ष पाहून ध्यानमग्न ऋषीमुनींची आठवण आली आणि ऋषीमुनींचा नि वृक्षांचा इतका घनिष्ठ संबंध का असतो याची जाणीव झाली. शालिमार गार्डनकडून आमची सवारी निशात बागेकडे निघाली . निशात बाग ही पर्वताच्या एका बाजूला बनविली आहे . जहांगीरने जेव्हा निशात बाग पाहिली तेव्हा तो म्हणाला," यह मेरे शालिमार से भी उत्तम है!" या बागेत कारंजी व दहा चबुतरे आहेत. चबुतऱ्यातले पाणी एकमधून दुसऱ्यात , दुसऱ्यातून तिसऱ्यात असे वाहत असते . दहाही चबुतरे व त्यांच्या आजूबाजूला असलेली झाडे व विविधप्रकारची विविधरंगी फुले मनाला मोहीत करीत असतात . वरच्या चबुतऱ्यावरील चिनारची झाडे भव्यतेतील एक आगळेवेगळे सौंदर्य उलगडून दाखवत असतात . येथून दल सरोवराचे सौंदर्य अधिकच उठून दिसत असते . निशात बाग दल सरोवराजवळच असून आम्ही प्रथम हार्वन गार्डनला गेलो आणि संध्याकाळी सर्वात शेवटी निशात बागेला भेट दिली . प्रत्येक ठिकाणी सरसोच्या तेलात बनविलेले पदार्थ असल्यामुळे दिवसभर मी फक्त सफरचंद खाऊन पेटपूजा केली. काश्मीरचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सफरचंदाच्या लाल फळांनी लगडलेल्या बागा होत. काश्मीरला आलुबुखारा व नाशपती यासारखी फळझाडेही ठिकठिकाणी आढळून आलीत .
एकाच दिवशी श्रीनगरमधील चार बगीचे पाहून पाय चांगलेच दुखायला लागलेत परंतु डोळे मात्र थकायचे नाव घेत नव्हते. काश्मीरचे सौंदर्य पाहायला डोळे चांगलेच उत्सुक होते. शेवटी सूर्यदेवाची आज्ञा मानून आम्ही आमच्या हॉटेलच्या रस्त्याला लागलोत आणि काश्मीरच्या स्वर्गीय सुखाची तृप्ती मनाला तृप्त करून गेली .
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.