बेंगलोरची दुखरी आठवण
बेंगलोरची दुखरी आठवण
१९८९ साली माझे लग्न झाले आणि माझ्या वैवाहिक जीवनाचा प्रवास श्री. दिलीप वेडू पाटील यांच्याबरोबर सुरू झाला आणि दोघांनाही फिरण्याची, भटकण्याची, प्रवास करण्याची आवड असल्यामुळे जेव्हा जेव्हा फिरण्याची संधी मिळाली की सोडायची नाही असे आमचे धोरण. माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींना कपडे व दागिने यात पैसा खर्च करण्याची हौस तर याउलट मी मात्र पैसे जमा करणार ते पुढच्या ट्रीपला कामी येतील या उद्देशाने.
१९८९ ला आम्ही जम्मू - काश्मीरला गेलोत तेव्हा आम्ही दोघांनी प्रवासाची मजा लुटली . त्यानंतर १९९० साली मला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि तो एक वर्षाचा असतानाच मी दुसऱ्यांदा गरोदर राहिले अशा परिस्थितही आम्ही एक वर्षाच्या चि .स्वप्नीलला घेऊन नुकतेच विवाहित झालेल्या माझ्या बहीण मेहुण्यांना व दोडल साहेब व दोडल वहिंनींसोबत उटी-म्हैसूर-बेंगलोर ट्रीप केली. दोडल वहिनींची दीड वर्षाची शेफाली आणि आमचा एक वर्षाचा स्वप्नील या दोघांनी प्रवासात कुठलाही त्रास दिला नाही. १९९१ मध्ये स्वप्नीलला व शेफालीला घेऊन केलेली ही ट्रीप या दोघांच्या बाललीला पाहत, अनुभवत जशी चांगली झाली तशीच ती थोडीशी लहान बहिणीच्या वेदना पाहून आतल्या आत अपराधीपणाची भावना घेऊनच झाली होती.
१९९१ च्या मे महिन्यात माझ्या लहान बहिणीचे लग्न झाले आणि त्यानंतर जुलै महिन्यात आम्ही व दोडल साहेब, वहिनीने उटी-म्हैसूर-बेंगलोरला जाण्याचे ठरविले. आमच्याबरोबर नुकतेच लग्न झालेल्या बहीण मेहुण्यांनी पण येण्याचे ठरविले. आम्ही सहा तिकिटांचे रेल्वेचे बुकिंग केले. तेव्हा आम्ही मनमाडलाच राहत होतो. मनमाडहून बेंगलोरचे तिकीट बुक केले. आमची ट्रेन मनमाड स्टेशनहून दुपारी दोन वाजता सुटणार होती आणि दुपारचे दीड वाजून गेलेत तरीदेखील माझे बहीण मेहुणे मनमाडला पोहचले नाहीत . त्याकाळी फोनची सुविधा नसल्यामुळे काहीच करू शकत नव्हतो. शेवटी आम्ही दीड वाजता मनमाड स्टेशनवर पोहचलो. एक वाजून पन्नास मिनिटांनी आमची ट्रेन आली आम्ही ट्रेनमध्ये आमचा बर्थ क्रमांक शोधून बसलो आणि बहीण मेहुणे पोहचतात की नाही या विवंचनेत पडलो. सगळेजण बाहेर बघत होतो, आता एक मिनिटांनी ट्रेन सुटणार तितक्यात बहीण मेहुणे धावतपळत येताना दिसलेत आणि जीव भांड्यात पडला. अगदी ट्रेन चालू होण्याची वेळ आणि त्या दोघांनी ट्रेनमध्ये पाऊल ठेवण्याची वेळ अगदी एकच झाली. त्यादिवशी एक वाजेपासून दोन वाजेपर्यंतचा त्या दोघांची वाट पाहण्याचा अनुभव आणि त्यांनी धावतपळत पकडलेली ट्रेन, वेळेला किती महत्त्व असते ते शिकवून गेली.
त्या दिवशी माझ्या बहीण मेहुण्यांना मालेगावहून मनमाडला येण्यास उशीर होण्यामागचे कारण होते ते म्हणजे खूप जोराचा पाऊस. त्यांच्या घराच्या समोर इतके पाणी साचले होते की त्या पाण्यातून रस्त्यापर्यंत येणेच शक्य नव्हते. खूप खटाटोप करून ते कसेतरी टॅक्सीने मनमाडला पोहोचलेत आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये स्वप्नीलने व शेफालीने चांगलीच धूम केली. त्यांना दोघांनाही ट्रेनच्या प्रवासाची चांगलीच मजा येत होती. मुलांनी कुठलाही त्रास दिला नाही त्यामुळे आपण लहान मुलांना घेऊन कसे फिरणार! ही शंका दूर झाली.
आम्ही बेंगलोरला आल्यावर एका हॉटेलमध्ये तीन रूम बुक केल्यात आणि फ्रेश होण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेलोत . रूममध्ये गेल्यावर थोड्याच वेळात माझ्या बहिणीने मला आवाज दिला . बहिणीच्या हाताला चांगलीच रक्ताची धार लागलेली . काचेच्या बांगड्या घालण्याची सवय नसल्यामुळे तिने हातात घातलेल्या काचेच्या बांगड्या काढायला गेली आणि बांगडी फुटून काच तिच्या हातात भरल्यामुळे मोठी जखम झाली आणि रक्त काही करता थांबत नव्हते . . मी दोडल वहिनीला तिच्याजवळ बसायला सांगितले आणि मी हॉटेलच्या काउंटरजवळ उभ्या असलेल्या माझ्या पतीला व मेहुण्यांना सांगितले," शारदाच्या हाताला बांगडी काढताना काच लागून जखम झाली आणि रक्त थांबत नाही . "माझे पती व मेहुणे हॉटेल मॅनेजरशी गप्पाच करीत होते, त्यांनी मॅनेजरला विचारले , " जवळ हॉस्पिटल आहे का?" त्याने आम्हांला हॉस्पिटलचा पत्ता दिला आम्ही ताबडतोब टॅक्सी करून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ते हॉस्पिटल बघून आम्ही अवाकच झालोत. त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक विभाग स्वतंत्र होता , बेंगलोरमधील ते प्रशस्त हॉस्पिटल पाहूनच आम्हांला आश्चर्य वाटले ( आता त्या हॉस्पिटलचे नाव आठवत नाही). आम्ही प्रथमच एवढे मोठे हॉस्पिटल पाहिले. जखम झाल्यावर टाके टाकण्यासाठी जो विभाग होता त्या विभागात आम्ही गेलोत आणि बहिणीच्या हाताला सात आठ स्टिचेस दिलेत . रूमवर येऊन सगळ्यांनी त्या दिवशी आराम केला.
माझ्या बहिणीला खूप त्रास होत होता पण तिने ते आम्हांला जाणवू न देता सर्वांसोबत ट्रिपचा आनंद घेतला. माझा हात दुखतो किंवा त्रास होतो हे तिने संपूर्ण ट्रीपमध्ये एकदाही उच्चारले नाही . एवढा सोशिकपणा हा आम्हांला आमच्या आईकडून मिळालेला खूप मोठा वारसा आहे. त्या संपूर्ण ट्रीपमध्ये तिला हाताचे दुखणे बाळगावे लागले. याचे आम्हां सर्वांना वाईट वाटत होते पण त्याचबरोबर प्रवासात काहीही होऊ शकते हा धडा आम्हांला शिकायला मिळाला. त्यामुळे बिनधास्तपणे प्रवास करण्याची सवयच आम्हां सर्वांना होऊन गेली.
जेव्हा जेव्हा बेंगलोरच्या पहिल्या ट्रिपचे फोटो पाहते तेव्हा तेव्हा बहिणीचे सर्व फोटो पाहून खूप वाईट वाटते. हातरूमालाने हात झाकून काढलेले तिचे फोटो म्हणजे मानवी वेदनेचे प्रतीक होय असे सारखे वाटते आणि गौतम बुद्धाचे 'दुःख हेच चिरंतन सत्य होय' याची प्रचीती येत असते.
या घटनेनंतर तीनदा बेंगलोरला जाणे झाले पण आजही बेंगलोर म्हणताच डोळ्यांसमोर उभे राहते ते म्हणजे हॉटेलमधील हाताला रक्ताची धार लागलेली आणि घाबरलेली अठरा वर्षाची नाजुकशी बहिणीची मूर्ती आणि त्याचबरोबर अंतर्मनात उठणारी दुखरी कळ ... !
हाताची जखम रूमालाने लपवित उजवीकडून उभी असलेली सौ . शारदा पवार , लेखिका सौ. ज्योत्स्ना पाटील, सौ. शारदा दोडल, चि. शेफाली, श्री. प्रविण पवार, श्री. सुजय दोडल आणि वरती बसलेला चि. स्वप्नील पाटील या सर्वांचा म्हैसूर येथील एका मंदिराच्या बाहेर उभे असतानाचा फोटो.

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.