गोव्याचा निसर्ग


गोव्याचा निसर्ग 

            गोवा म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारं, तरुणांना वेडं करणारं, नवविवाहितांना धुंद करणार, तुम्हां - आम्हां सर्वांना नैसर्गिक सुख लुटू देणारं असं हे गोवा सदा चिरतरूण. 
            गोवा म्हटले की उंचच उंच ताडामाडाची झाडे, आंब्या-फणसाची झाडे व सोबतच समुद्रकिनारा डोळ्यांसमोरून तरळून जातो. गोव्याचा निसर्ग चित्रकाराला आव्हान देतो तसाच तो कवींनाही कविता लिहिण्यास भाग पाडीत असतो तर फोटोग्राफरला नवनवीन पोझ देत असत. 
             'माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले' 
              या बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळींचा खरा अर्थ जाणून घ्यायला गोव्यातच जायला हवे . आपल्याकडे हिरव्यागार पानांमध्ये पांढऱ्या रंगांची उधळण करीत फुलणारा बहारदार चाफा पाहण्याची डोळ्यांना सवय तेथे पाने नसलेला चाफा पाहून आश्चर्य वाटते . चाफ्याच्या झाडाला पानांचे जणूकाही वावडेच असावे . फक्त फुलांचे गुच्छ पाहून वाटते की हे गुच्छ झाडाच्या फांद्यांना कुणीतरी चिटकवून दिलेत की काय ! 
               गोव्यातली माणसे खूप झाडे लावीत असावीत असे तिथे गेल्यावर वाटते . जिथे तिथे झाडी पाहून असे  वाटणे साहजिक आहे परंतु , प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे . गोव्यातील लोक फारशी झाडी लावताना दिसत नाहीत . त्यांच्या पूर्वजांनी जी काही झाडे लावलीत त्यानंतर त्या अंगणात जिथे कुठे बी पडले असेल तिथेच ती बी आपली पाळेमुळे रूजवून ठाण मांडून बसते . अशी ही गोव्यातली झाडे अनाथासारखी वाढत असतात . त्यामुळेच ती भक्कमपणे पाय रोवून परिस्थितीशी झगडतांना दिसतात . याउलट आपल्याकडची झाडे कितीही लाड पुरविलेत तरी ती बाळसं धरायचे नाव घेत नाहीत . चार - पाच वर्षे मालकाकडून चांगले कोड - कौतुक करून घेतील तेव्हा कुठे ती तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचतात . 
              गोव्यात तुम्ही कुणाच्याही घरी जा . प्रथम तुमचे स्वागत होईल अंगणातच पडलेल्या पानाफुलांच्या रांगोळीने . ज्या पानाफुलांना आपण पाचोळा म्हणतो तोच पाचोळा मला गोव्यात निसर्गाने काढलेल्या रांगोळीसारखा वाटला , असे का ? याचा मी विचार करू लागले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गोव्यातून दिवसातून दहावेळेस जरी अंगणातला पालापाचोळा गोळा केला तरी तो पुन्हा अंगणात पसरणार . कारण गोव्याच्या निसर्गाचं वैशिष्ट्यच आहे पसरणे . गोव्याच्या निसर्गातच एक मस्ती आहे , धुंदी आहे , बेछूटपणा आहे . येथील वाऱ्यात मस्ती भरली आहे , पावसात धुंदी सामावलेली आहे आणि सूर्याच्या किरणांमध्ये बेछूटपणा विखुरला आहे . ऊन , वारा आणि पाऊस यांना टक्कर देत घट्टपणे पाय रोवून उभी राहणारी झाडे ही गोव्याचे भूषण होय . 
            गोव्याची झाडे जशी कुठेही जागा पकडून बस्तान मांडतात तशीच तेथील घरेही . गोव्यातली छोटी छोटी खेडी पाहिली तर ओळीने घरे दिसणे मुश्कीलच होय . येथील वाटा देखील फसव्या . आपल्याला वाटते आपण उताराच्या दिशेने जात आहोत , पुढे चढ असेल किंवा सपाटी परंतु तेथून पुन्हा दोन वाटा आणि त्या वाटांच्या खाली झाडीत गुडूप झालेली घरे . असे हे वाटांचे चक्र पाहून आश्चर्य वाटते . गोव्यातली घरे तर झाडीतच लपलेली दिसतात . गोव्यातल्या खेड्यांमधील अनेक घरे इतकी फसवी वाटतात की क्षणभर आपण गोंधळातच पडतो . येथील फसव्या घरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही घरे पुढच्या अंगणातून गेले तर एकमजली आणि मागच्या अंगणाने गेले तर दुमजली . बरीचशी घरे ही उतारावर बांधल्यामुळे चढाच्या दिशेने एकमजली घर व उताराच्या दिशेने दुमजली घर . अशी ही फसवी घरे पुन्हा झाडांमध्ये गडप झालेली दिसतात . गोव्यातील खेडी कुठे संपतात आणि कुठे सुरू होतात हे बाहेरील लोकांना कळत नाही . संपूर्ण गोवा हे जणूकाही खेड्याखेड्यांनी जोडलेले शहर होय असे वाटते . 
              गोव्याच्या निसर्गाने गोव्यातील लोकांना आळशी बनविण्याचे काम केलेले दिसून येते . येथील शेतीच्या कामाला देखील खूप कष्ट करण्याची गरज भासत नाही . गोव्यात बैल तर चुकून दिसला तर दिसला अन्यथा नाही . कारण भरपूर पावसामुळे फक्त भाताची लावणी केली जाते . इतर पिके घेण्याचे प्रमाण जवळजवळ नाहीच्या बरोबरीने . त्यामुळे येथील शेतकऱ्याला फारसे काम करावे लागत नाही . वर्षापुरता तांदूळ पिकला की झाले काम . सोबतीला वडिलोपार्जित नारळ , आंबा फणस काजू आहेतच . त्याच काजू नारळाची फेणी प्यायची व भातमासे खाऊन जगायचे एवढाच काय यांचा जगण्याचा सोस  . 
               गोव्यातील लोकांवर निसर्गाचे उपकार ही खूप . निसर्गाने गोव्यातील लोकांच्या कपड्यांची देखील काळजी घेतलेली दिसते . गोव्यातील लोक उघडेबंब फिरत असतात त्यात त्यांचा काय दोष ? सतत ओघळणाऱ्या घामाच्या धारांनी अंगावर कपड्यांचेही ओझे होऊन जाते . येथील ख्रिश्चन धर्मीय नागरिकांचे प्रमाण अधिक असल्यामुळे येथील  बायका फ्रॉक , स्कर्ट किंवा गुडघ्यापर्यंत साडी अशी वेशभूषा करतात असे  आपल्यासारख्या बाहेरील पर्यटकांना वाटणे साहजिक आहे परंतु खरी परिस्थिती पाहिली तर येथील दमट हवामानामुळे ही वेशभूषा सोयीस्कर होय . पावसाळ्यातही सतत धो धो पडणारा पाऊस आणि रस्त्याने वाहणारे लाल मातीचे पाणी म्हणून पावसाळ्यातही संपूर्ण पायघोळ पोशाख घालणे अवघडच . पावसाळ्यातही गुडघ्यापर्यंतचा पोशाख करणेच सोयीचे असते . 
              गोव्यातला पुरुष हा स्त्री पेक्षा आळशी आहे . ( अर्थात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत पुरूष अपवाद आहेत . ) येथील स्रिया अधिक काम करताना दिसतात . बिअर बार , वाईन शॉपही येथे स्रिया चालवताना दिसतात . यावरून समजू शकतो की स्रियांचे प्रमाण सर्वच क्षेत्रांमध्ये अधिक आहे . बहुतांशी पुरुष हे व्यसनाच्या आहारी जाऊन जुगार खेळण्यात वेळ वाया घालताना दिसतात . छोट्याशा खोपटातही जुगाराचे अड्डे सर्रासपणे चालतात . जुगार आणि लॉटरी हे गोव्याला मिळालेले शाप आहेत . गोव्याचे राजकारण देखील जुगार व लॉटरीवर चालते . जुगार व  लॉटरी बंद करायचे ठरवले तर राजकारण्यांची खुर्ची गेली म्हणून समजायचे , त्यामुळे गोवा सरकारला जुगार व लॉटरीच्या विळख्यातून गोव्याला कसे मुक्त करावे हा प्रश्न सतत छळीत असतो . गोव्यातील वृत्तपत्रांमध्ये जुगार , लॉटरी , अपघात ,खून व आत्महत्या यासारख्या वृत्तांचे प्रमाण सर्वाधिक असते . गोव्यातील पुरूष कामावर जाण्याऐवजी तेथील बायका व मुलीच कामावर जाताना दिसतात . तरूण मुलांवरही वडिलांचेच संस्कार दिसून येतात . गोव्यात तरूण मुलींना दुसऱ्याच्या घरी घरकामासाठी किंवा इतर कामासाठी पाठविले जाते तेव्हा या मुली मालकाच्याच घरी राहतात . अर्थात परिस्थिती गरीब असणाऱ्या पालकांच्या मुलींना दुसरीकडे कामाला पाठविले जाते आणि या मुली स्वकमाईचे पैसे बँकेत जमा करतात . वीस - पंचवीस हजार रुपये जमलेत की स्वतःच्या लग्नाची सर्व खरेदी स्वतःच करतात आणि बोहल्यावर चढतात . लग्नाला आलेल्या पाहुण्यांना आईस्क्रीम दिले की झाले यांचे लग्न . उच्चभ्रू लोकांची लग्ने मात्र थाटामाटात होतात . 
              गोव्यातील माणसाला वेळेशी काहीही देणेघेणे नसते . तुम्हांला तुमचे काम व्हावे असे कितीही वाटत असले तरी गोव्यातील माणूस त्याच्या लहरीनुसार काम करीत असतो . 
             अर्थात हे सर्व वर्णन ओल्ड गोव्याचे आहे . याउलट न्यू गोवा आहे . न्यू गोव्याला समुद्रकिनारा लाभल्यामुळे तेथे उच्चभ्रू लोकांचे व देश - विदेशातील पर्यटकांचे प्राबल्य अधिक आहे . न्यू गोवा हा समृद्ध परिसर आहे याउलट ओल्ड गोवा हा दुर्बल परिसर होय  . खाणीत काम करणारे व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा परिसर म्हणून ओल्ड गोवा ओळखले जाते . 
                गोवा व गोव्यातील माणसे कसेही असोत परंतु गोव्याच्या निसर्गातील हिरवाई व लाल माती आणि खळाळता समुद्र सर्वांना भुरळ घालतो आणि पुनःपुन्हा गोव्याला बोलावित असतो एवढे मात्र नक्की .   

Comments

  1. गोवा,खरचं खूप छान आहे एकदा बघितले संधी मिळाली तर पुन्हा एकदा बघेल

    ReplyDelete
  2. जरूर जा. मला तर दरवर्षी जावेसे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या