लंगरमधील भोजन

             मागील आठवड्यात बाहेरगावी गेल्यामुळे ब्लॉगवर लेख पोस्ट करू शकले नाही त्याबद्दल काही वाचकांनी फोन करून तर काही वाचकांनी व्हाटसएपवर मेसेज करून विचारणाही केली त्याबद्दल मी दिलगीर आहे. 
              तसेच 'माझी भटकंती' या ब्लॉगची लिंक ज्या वाचकाने 'मायबोली डॉट कॉम' ला शेअर केली त्या वाचकाला मनापासून धन्यवाद देते.   
              माझा दुसरा ब्लॉग 'माय किचनजेडी' या ब्लॉगची लिंक ज्या वाचकांनी फेसबुकवर शेअर केली त्या सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद देते.
              तुम्हां सर्व वाचकांमुळे मला लिहिण्यास बळ मिळत असते त्यामुळे सर्व वाचकांचे आभार!    




लंगरमधील भोजन 
              

                       जम्मूपासून साधारणपणे ४० - ४५ कि. मी. अंतरावर 'कटरा' नावाचे गांव आहे. या गावाजवळ असलेल्या पर्वतावर वैष्णोदेवीचे मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडच्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी नांदुरी हे गांव आहे त्याप्रमाणेच कटरा हे गांव वैष्णोदेवीच्या पायथ्याशी आहे. पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर पर्वताच्या हिरव्यागार रंगाचा आणि आकाशातील निळ्याशार रंगाचा जो अनुपम देखावा दृष्टिस पडला ते पाहून 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे'  नकळतपणे  बालपणी पाठ केलेल्या कवितेच्या ओळी ओठांवर आल्यात. ते समोरचे दृश्य पाहून शांत, सुकून या शब्दांचा खरा अर्थ उलगडला आणि मनही शांतावले नि डोळे सुखावलेत. 
                   आम्ही जून १९८९ मध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलो असता तेथे पर्वताच्या पायथ्याशीच भाविकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. जेवणात छोले, मटार किंवा न्यूट्रीला ( सोयाबीन चंक ) ची भाजी, पुरी,डाळ-भात असायचा. मी न्यूट्रीला प्रथमच पाहिला आणि त्याची भाजीही प्रथमच खाऊन पाहिली. भाजी खरंच चविष्ट होती आणि त्यानंतर आमच्या घरी न्यूट्रीला कायमचाच वास्तव्यास आला. अशा या चविष्ट जेवणानंतर साजूक तुपातला भरपूर काजू, बदाम व बेदाणे घालून केलेला शिरा प्रसाद म्हणून मिळायचा. अर्थात हा शिरा आपल्याकडच्या सत्यनारायणाच्या प्रसादाएवढा नसायचा. हा प्रसाद भाविक पोटभरेपर्यंत खाऊ शकायचे. येथील प्रसादरूपी शिरा खाल्ल्यावर मला माझ्या आजीच्या हातच्या शिऱ्याची आठवण आल्यावाचून राहिली नाही. वैष्णोदेवीच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या भोजनगृहाला 'लंगर' म्हणतात असे माझ्या जेठ यांनी आम्हांला सांगितले. हे लंगर एका छोट्याशा ओढ्यावर बांधलेले होते. हे लंगर छोट्याशा ओढ्यावर बांधलेले पाहून मला ते बांधणाऱ्या वास्तुविशारदाच्या कल्पकतेचे खरेच कौतुक वाटले. कोणती वास्तू कोठे उभारल्यावर त्याचा परिणाम व्यक्तीवर कसा होऊ शकतो हे ते लंगर पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवले. या भोजनगृहात दररोज हजारो भाविक आपली क्षुधा तृप्त करून देवीच्या दर्शनाला तृप्त मनाने जात असत. 
                    या भोजनगृहातील वास्तूबरोबरच मनाला आणखी एका गोष्टीने आमचे लक्ष वेधून घेतले . येथे भाविकांची सेवा करणारे सेवक उष्टी, खरकटी भांडी वरूनच फेकत आणि ती सर्व भांडी खाली ओढ्याच्या पाण्यात धप्पकन पडायचीत. ते दृश्य जरा अजबच वाटले म्हणून आम्ही वरून खाली पाण्यात पाहिले तर ओढ्याच्या पाण्यात भांड्याचा ढीग पडलेला दिसला. पाण्याच्या लाटेबरोबर एक एक भांडे हळूहळू पुढे सरकत सरकत जाऊन जेथे दगडांचा बांध घातलेला होता तेथे जाऊन सर्व भांडी जमा होत होती. एकदाची खूप भांडी जमा झालीत की दोन तीन सेवेकरी खाली जाऊन पाण्यातली सर्व भांडी गोळा करून वरती घेऊन यायची . हजारो भाविकांची उष्टी, खरकटी भांडी धुण्याची ही नामी शक्कल पाहून मला तेथील कर्मचाऱ्यांचे कौतुक करावेसे वाटले. भांडी धुण्याचा इतका उत्कृष्ट नमुना मी इतरत्र कोठेही पाहिला नाही. त्या नितळ पाण्यात ती स्टीलची भांडी खूपच सुंदर भासत होती. सूर्यकिरणांच्या सहवासात चकाकणारे पाणी आणि पाण्याच्या सहवासात चमकणारी स्टीलची भांडी आणि त्या दोहोंच्या सहवासाने लकाकणारे आमचे डोळे. सूर्याची किरणे, ओढ्याचं पाणी, स्टीलची भांडी आणि माणसांचे डोळे या चारही घटकातलं चकाकणं एक वेगळीच अनुभूती देत होते. एका वेगळ्याच भावावस्थेत आपण तल्लीन होऊन जातो. या लंगरमधील भांडी धुण्याचं अनोखं तंत्र ज्या अफलातून डोक्यातून आलं त्या डोक्याला व त्याच्या कल्पकतेला मी मनोमन सलाम केला. 
                   १९८९ साली आम्ही ज्या लंगरमध्ये जेवण केले त्या लंगरविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली म्हणून आम्ही तेथील सेवेकऱ्यांना काही प्रश्न विचारले परंतु त्यांनी आमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. कटरा येथील हे लंगर जम्मूचे पाच व्यापारी चालवितात. या व्यापाऱ्यांना देवीच्या आशीर्वादाने धंद्यात भरपूर पैसा मिळाला त्यामुळे ते देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना तृप्त करतात, असे आमच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशांकडून सांगण्यात आले होते परंतु त्यानंतर काही वर्षांनी संगीतकुमार, गायक गुलशनकुमार यांची हत्त्या करण्यात आली आणि तेव्हा समजले की कटरा येथील लंगर गुलशनकुमार चालवित होते. त्यांच्या हत्त्येनंतर मात्र हे लंगर बंद पडले ते कायमचेच. 
                     संगीत म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांना जोडणारा दुवा होय, तरीदेखील संगीत क्षेत्रातील स्पर्धेने गुलशनकुमार यांच्या हत्त्येचे टोक गाठावे यापेक्षा दुर्दैव कोणते! आजही वैष्णोदेवीचे नाव घेताच गुलशनकुमार यांचे लंगर आठवत. आज गुलशनकुमार नाहीत की त्यांचे ते भोजनगृहही नाही परंतु माझ्यासारखे त्या सात्विक भोजनाने तृप्त झालेले हजारो भाविक कटरा येथील या लंगरला विसरणे शक्य नाही.     

Comments

  1. आम्ही गेलो तेव्हा लंगर बंद झाले होते. त्यामुळे आम्ही लंगर मधील जेवणाला मुकलो म्हणायचे🙁

    ReplyDelete
    Replies
    1. एक चांगली संधी हुकली. धन्यवाद.

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या