धन्यवाद स्क्रिनशॉट

                    धन्यवाद स्क्रिनशॉट 
       शीर्षक वाचून गोंधळलात ना! आपण चुकीचे तर वाचत नाही ना! असेही क्षणभर वाटले असणार किंवा लेखिकेनेच काहीतरी चुकीचे टाईप केले असेल, कदाचित नजरचुकीने टाईप झाले असणार पण असे काहीच नाही. तुम्ही योग्यच वाचले आणि मीदेखील योग्यच टाईप केले आहे. जीवनात कोणत्या गोष्टीचा कुठे संदर्भ लागेल आणि काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. चला तर मग, तुमच्याही जीवनात कधी असा प्रसंग उद्भवला तर तंत्रज्ञानाचा योग्य कामासाठी उपयोग कसा करायचा ते नक्कीच कळेल तुम्हांलाही! 
         मला नेहमीच निसर्गातल्या सर्वच सजीव निर्जीव घटकांविषयी कृतज्ञता वाटत असते. आज मी तंत्रज्ञानाविषयीही कृतज्ञ आहे. कारण तंत्रज्ञानामुळे खूप गोष्टींची विश्वासार्हता जोखून पाहणे सहज शक्य झाले आहे. माणूस एकवेळ खोटं बोलेल पण तंत्रज्ञानामुळे सत्य जोखून पाहणे माणसाला सहज शक्य झाले आहे. असाच एक अनुभव. 
           मला एका व्यक्तीने सांगितले की, "अमुक एक व्यक्ती असं म्हणाली." आणि योगायोगाने दोन दिवस अगोदरच माझे त्या व्यक्तीशी बोलणे झाले होते. त्यामुळे मला सांगू पाहणाऱ्या  व्यक्तीला  मी सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा मला सांगणाऱ्या व्यक्तीने माझ्याच जवळच्या व्यक्तीला जेव्हा 'ध' चा 'मा' करून सांगितले की, ज्योत्स्नाचा आपल्यावर विश्वास नाही आणि तिने त्या अमुक व्यक्तीला फोन करून आपल्याविषयी शहानिशा केली. जेव्हा माझ्याच जवळची व्यक्ती मला म्हणाली की, "तू फोन करून शहानिशा केली का?" जवळच्या व्यक्तीचा आक्षेप ऐकून मला हसूच आले कारण मला इतरांच्या कोणत्याही गोष्टीत कधीच रस नसतो नि शहानिशा करण्यात फालतू वेळ घालवून डोक्याला नसता मनःस्ताप करण्यात तर बिलकूलच नाही. दिवसभर ज्या कामांची यादी समोर असेल ती कामे मन लावून करणे मला मनापासून आवडत असते. इतरांच्या कामात लुडबूड करणे किंवा इतरांच्या खासगी गोष्टीत दखल घेणे या गोष्टींपासून मी कोसो दूर असते त्यामुळे कुणाला फोन करून चौकश्या करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तरीही समोरच्या व्यक्तीचा आक्षेप मान्य केला कारण तंत्रज्ञान माझ्या सत्याची शहानिशा करण्यासाठी मला पुरेसे होते. मी मला आलेल्या फोन कॉलची डिटेल्स काढलीत आणि त्याचा स्क्रीन शॉट काढून आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला पाठवून दिलीत. आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला सगळे काही कळून चुकले की, माझे खरेच दोन दिवस अगोदरच बोलणे झाले होते.
              सत्य हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते या गोष्टीवर माझा ठाम विश्वास असल्यामुळे मी माझ्या निर्णयावर ठाम असते आणि या ठाम असण्यालाच काहीजण हेकटपणा म्हणतात तेव्हा मला समोरच्याची फक्त कीवच येत असते. आज मात्र मी तंत्रज्ञानाला धन्यवाद दिलेत कारण त्याच्यामुळेच मला माझी विश्वासार्हता दाखवणे सहज शक्य झाले. स्क्रीन शॉटचा माझ्या जीवनात असाही उपयोग होईल असे मला कधीच वाटले नव्हते पण आज मी स्क्रीन शॉटला मनापासून धन्यवाद दिलेत.     
©ज्योत्स्ना पाटील.            

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या