हँडमेड कुस्करा

नमस्कार रसिक वाचक, 
आजची भटकंती आपण महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत करू या. त्याचबरोबर घरघरातील नातेसंबंधातही फेरफटका मारून येऊ या आणि  माझ्या लेखन प्रवासात साथ देणाऱ्या वाचकांनाही भेटू या. या एकाच लेखात तुम्हांला वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करण्याचा आनंद नक्कीच मिळेल. अशी मला आशा आहे. जिच्यावर हा लेख लिहिला ती आज एकवीस वर्षांची झाली पण तिचे बालपण आजही डोळ्यांसमोर नाचत आहे, बागडत आहे. आजचा लेख माझी पुतणी चि. सायली खैरनार हिच्यासाठी      

हॅण्डमेड कुस्करा 

               माझी पुतणी चार वर्षांची होती तेव्हा ती प्रथमच एकटी आमच्यासोबत नाशिकला आली होती. दीर व जाऊ तिला आमच्यासोबत पाठवायला तयार नव्हते. त्या दोघांना भीती वाटत होती की ती रात्री झोपताना रडेल व आम्हांला त्रास देईल. माझ्या पुतणीने आमच्याबरोबर येण्याचा हट्ट करताच आम्ही तिला आईबाबांच्या आठवणीने रडणार नसशील तरच आम्ही तुला नाशिकला नेऊ, अशी अट घालताच बाईसाहेब एकदम खूष. शेवटी आम्ही दीर व जावेला राजी केले नि तिची बॅग भरायला सांगितले. त्या दोघांना तुम्ही काही काळजी करू नका , ती छान राहील असे आश्वासन देऊन पुतणीला घेऊन रात्री अकराच्या ट्रेनने नाशिकला येण्यास निघालो. माझी पुतणी प्रथमच ट्रेनने प्रवास करीत होती त्यामुळे तिला खूप गंमत वाटत होती. नेहमी आई बाबांबरोबर कारने प्रवास करणारी आज चक्क हजारो लोकांबरोबर मोठया ट्रेनने प्रवास करत होती.  तिला अनेक प्रश्न पडत होते नि तिच्या प्रश्नांची सर्वांना गंमतही वाटत होती. ट्रेनने वेग घेताच दीर व जाऊ दोघांच्याही मनाची चांगलीच घालमेल झालेली दिसली. शेवटी एकदाचे आम्ही सायलीला घेऊन नाशिककडे निघालो. पहाटे पाच वाजल्यापासून चहा विक्रेत्यांची लगबग सुरू झाली. सायलीला तिच्या काकांनी विचारले, "सायली बेटा, चहा घेतेस का?" तिने लागलीच "हो काका." तितक्यात आमचे दोघे कार्टून्स तिला म्हणाले, "सायली, चहा नाही घ्यायचा, आपण आता थोडया वेळात घरी पोहचल्यावर दूध घेऊ या." तिला मात्र ट्रेनमधला चहा प्यायचा होता त्यामुळे ती, " मी चहा पिणार, दूध नाही." तिच्या काकांनी तिला चहा देताच बाईसाहेबांची कळी चांगलीच खुलली. आम्ही घरी पोहचताच तिने तिच्या आई बाबांना फोनवर बोलताना ट्रेनचे रसभरीत वर्णन केले ट्रेनमधील चहा किती छान होता असे सांगणारी ती एकमेव प्रवासी असावी असे मला वाटले. मुले तिला चिडवू लागली," सायली, आम्हांला 'रेल्वे स्टेशनवरील एक तास' हा निबंध आता छान लिहिता येईल." अशाप्रकारे तिच्या व आमच्या स्मरणात राहिलेला हा ट्रेनचा प्रवास कधीच विसरणे शक्य नाही. 
             माझी पुतणी (सायली ) तेव्हा आठ दहा दिवस आमच्याकडे राहिली असतानाच एके दिवशी चार - पाच पाहुणे आमच्याकडे आले होते. पाहुणे असल्यामुळे मी स्वयंपाक थोडा जास्तच केला होता. दुपारी जेवण करून पाहुणे लागलीच गेलेत. संध्याकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी मी पोळ्यांचा डबा उघडला तर त्यात चार - पाच पोळ्या उरल्या होत्या. रात्री जेवणासाठी मी स्वयंपाक थोडा कमीच केला कारण उरलेल्या पोळ्यांचा फोडणी देऊन कुस्करा केला. स्वयंपाक झाल्यावर सर्वजण जेवायला बसलो असता, मी सर्वांच्या ताटात फोडणीचा कुस्करा वाढला, परंतु पुतणी लहान असल्यामुळे तिला शिळे अन्न वाढू नये या उद्देशाने मी तिच्या ताटात कुस्करा वाढला नाही. आम्ही सर्वजण जेवण करू लागलो पण आमची सायली बया काही जेवत नव्हती. तिला ताटावर गप्प बसलेले पाहून मी विचारले, "सायली, तू जेवत का नाहीस?" मी असे विचारताच आमच्या बाईसाहेब फुरंगटून म्हणाल्या," काकू, तुम्ही मला ते (कुस्कऱ्याकडे बोट करून) दिले नाही; त्यामुळे मी जेवत नाही." ' हाय रे,देवा!' बालमानसशास्र जपण्याचा आम्ही कधी प्रयत्नच करीत नाहीत, याची जाणीव त्या क्षणी मला झाली. तिला कुस्करा वाढताच बाईसाहेबांची कळी खुलली. जेवण करताना तिने माझ्याकडून वदवून घेतले की उदया आपण असाच कुस्करा करायचा. ती मला म्हणाली, काकू उदया आपण शंभर पोळ्या करू नि मग त्याचा कुस्करा करायचा." तिच्या त्या वक्तव्यावर आम्ही सगळेच हसलोत नि माझी मुले म्हणाली, "शंभर पोळ्यांचा कुस्करा आपल्याला संपूर्ण कॉलनीलाच वाढावा लागेल." आज केव्हाही मी पोळ्यांच्या डब्यात जेवणानंतर उरलेली पोळी पाहिली की, सायलीच्या शंभर पोळ्या आठवतात नि हसू येते. खरंच बालपण किती निरागस  असते याची प्रचिती येते. 
                पोळ्यांच्या कुस्कऱ्याला मनोरमा, मनोहरा, तिखट काला, फोडणीची पोळी, चुरमा किंवा कवी किशोर पाठक यांच्या काकांप्रमाणे फोपो म्हणा . अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते त्याचबरोबर त्याची बनविण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. कुणाला त्याच्यात शेंगदाणे घातलेले आवडतात, तर कुणाला शेंगदाणे नको असतात, मला मात्र भरपूर कांदा , कोथिंबीर व मटाराचे दाणे घालून केलेला कुस्करा आवडतो. असा हा पोळ्यांचा कुस्करा करताना माझ्या मुलांची मला सक्त ताकीद असते, कुस्करा हातानेच केलेला असावा. मिक्सरमधून काढलेला नसावा. मुलांच्या म्हणण्यात तथ्य आहे कारण अनेकजण मिक्सरमधून पोळ्या बारीक करतात त्यामुळे त्याला चव येत नाही. याउलट हाताने केलेल्या पोळ्यांचा कुस्करा खरंच स्वादिष्ट लागतो. हॅण्डमेड वस्तू या महाग, किंमती असतात. हॅण्ड वर्कच्या महागडया साडया व ड्रेस घालणाऱ्या स्रियांना हॅण्डमेड फूडचे महत्व का समजत नाही, असा प्रश्न  पडतो.   
              जशी तिखट कुस्कऱ्याची गंमत घडली तशीच गोड कुस्कऱ्याचीही एक वेगळी कहाणी आहे. माझ्याकडे उन्हाळ्याच्या सुटीत माझे पुतणे-पुतण्या व भाचा-भाची असे सर्व बालगोपाळ यायचेत. सर्व मुलंमुली मिळून आठनऊ जण जमायचेत. या सर्वांना दुपारी क्रिकेट खेळून आल्यावर कडकडून भूक लागायची मग सगळे गोंधळ घालायचेत, काकू भूक लागली, आई भूक लागली, मामी भूक लागली, मावशी भूक लागली अशा सर्व नावांनी व नात्यांनी माझं घर गजबजून जायचे नि मग मी या सर्वांना सात-आठ पोळ्यांचा बारीक कुस्करा करून त्यात वाटीभर साजूक तूप नि वाटीभर किसलेला गूळ घालून मस्तपैकी गोड कुस्करा करायचे नि सगळ्यांना एकाच ताटात खायला द्यायचे. एकदा माझ्या मोठ्या नणंद माझ्या घरी आल्या असता मी त्यांच्यासमोरच त्यांच्या तिघा मुलांना गोड कुस्करा खायला दिला तेव्हा त्या आश्चर्याने मला म्हणाल्या, "वहिनी, माझे हे तिघे नमुने घरी गुळतुपाचा कुस्करा खात नाहीत आणि येथे तुमच्याकडे मस्तपैकी खात आहेत." त्यांच्या त्या बोलण्याचे मला हसूच आले नि मग मी हसत हसतच त्यांना सांगितले, "आक्का, त्यासाठी कुस्करा खूप बारीक करावा लागतो नि त्यात भरपूर तूप नि गूळ घालून चांगला एकजीव केला की मग न खाणारेही हा कुस्करा आवडीने खातात. तुमच्या भावाचे मित्रही आधी नाही म्हणायचेत नंतर मात्र तेही आवडीने खाऊ लागलेत. त्यांच्या बायका आता त्यांना भाजी नाही आवडली का सरळ गूळतुपाचा कुस्करा करून देतात." 
                 मनमाडला एकदा ख्रिस्ती समाजाच्या कमल मॅडम मला म्हणाल्या होत्या," अगं, तुम्हां महाराष्ट्रीयन लोकांचा गुळतुपाचा कुस्करा मला खूप आवडतो. मी आठवड्यातून दोन दिवस तरी डब्याला गुळतुपाचा कुस्करा घेऊन जाते. माझ्या ऑफिसमधील सर्वांना खूप आवडतो माझ्या डब्यातला गोड कुस्करा." खरंच कमल मॅडमचे ते बोल खूप भावलेत. खाद्यसंस्कृती माणसांना जोडण्याचे काम किती नकळतपणे करीत असते.   
                असा हा पौष्टीक कुस्करा आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात सर्वांनी आवर्जून खायला हरकत नाही   
  

फोटोत चि. सायलीचे आईवडील आणि सखेसोबती तिच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करताना.
(हा लेख गांवकरीच्या 'प्रतिमा' पुरवणीत दि. २८ जून २०१२ ला प्रकाशित झाला आहे)
हा लेख वाचून प्रतिक्रिया देणारे वाचक 
प्रा. छाया लोखंडे 
श्रीमती अर्चना काळे 
श्रीमती लता पाटील 
श्रीमती सुनिता कुलकर्णी 
श्रीमती स्वाती पाचपांडे 
श्रीमती ललिता जाधव 
श्री. संजय घुले 
श्री. सचिन साळुंके

©ज्योत्स्ना पाटील    

Comments

  1. खूप छान लेख आहे वहिनी

    ReplyDelete
  2. खूप छान लेख आहे वहिनी

    ReplyDelete
  3. धन्यवाद माई.

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या