स्वयंचलित कॅमेरा


  स्वयंचलित कॅमेरा 
              
                      जून १९८९ मध्ये मी व माझे पती काश्मीरला जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग करून प्रवासाच्या तयारीला लागलो . आमची तयारी चालू असतानाच नुकतीच ओळख झालेले सुजय दोडल आमच्या घरी आले व त्यांनी विचारले , " कसली धावपळ चालू आहे ." आम्ही काश्मीरला चाललो म्हणून थोडीशी तयारी चालू आहे . त्यांनी कधी व कशाने चाललो याविषयी विचारपूस केली . माझे पती म्हणाले , " बऱ्यापैकी तयारी झाली आता फक्त माझा कॅमेरा खूप जुना आहे त्यामुळे एक नवीन कॅमेरा तेवढा घ्यायचा आहे . कॅमेराचे  नाव काढताच दोडल साहेब म्हणाले , " कॅमेरा कशाला विकत घेता ? मी आताच नवीन कॅमेरा घेतला आहे तोच घेऊन जा ." दोडल साहेबांनी असे म्हटल्यावर आम्ही नवीन कॅमेरा न घेता त्यांचाच कॅमेरा घेऊन जायचे ठरवले पण जेव्हा दोडल साहेबांनी कॅमेरा आणून दिला तेव्हा तो न्यावा की नेऊ नये असा पेच पडला कारण त्यांचा कॅमेरा हा खूप किंमती होता . त्यांनी दिलेला तो महागडा कॅमेरा बिघडला किंवा हरवला तर असे विचार मनात येत असतानाच दोडल साहेब म्हणाले , " कशाला विचार करता पाटील साहेब , कॅमेरा माझा काय किंवा तुमचा काय ! " 
                एकदाची सर्व तयारी झाली आणि आम्ही काश्मीर प्रवासाला निघालो . काश्मीरला पोहचल्यावर वैष्णोदेवीचे प्रथम दर्शन घेण्यासाठी पर्वत चढण्यास सुरुवात केली आणि पर्वतावर चढताना आजूबाजूचा निसर्ग पाहून माझ्या पतीने लागलीच कॅमेरा काढला आणि फोटो काढण्यासाठी माझे मोठे दीर ,जाऊबाईला व मला साईड wall वर बसण्यास सांगितले . दोडल साहेबांनी दिलेला कॅमेरा हा स्वयंचलित असल्यामुळे माझ्या पतीने कॅमेरा ठराविक अंतरावर ठेवून माझ्या मोठ्या दिरांच्या आणि माझ्यामध्ये असलेल्या रिकाम्या जागेत बसण्यासाठी पळत पळत आले परंतू ते त्यांच्या जागेवर येऊन बसेपर्यंत कॅमेराने आम्हां  तिघांनाच फोटोत बंदिस्त केले आणि आम्ही सर्वजण खो खो करीत हसत सुटलोत . माझ्या जाऊबाई म्हणाल्या , " दादा , कॅमेराला तुम्ही काही आवडत नाहीत म्हणून तो तुम्ही येण्याच्या आतच फोटो काढून मोकळा झाला . " माझे पती म्हणाले , " मीही बघतो , तो कसा माझा फोटो काढत नाही . " सुरुवातीला कॅमेराचे आणि माझ्या पतीचे टायमिंग जुळायला जरा वेळ लागला . मी निशात गार्डनमध्ये फोटो काढण्यासाठी बसले असता आमच्या महाशयांनी कॅमेरा ठराविक अंतरावर ठेवून माझ्याजवळ बसण्यासाठी पळू लागताच कॅमेराने क्लिक केले आणि तसाच फोटो कॅमेरात बंदिस्त झाला . कॅमेरा आणि माझे पती यांचे चोर पोलिसचा खेळ पाहून आम्हांला चांगलेच हसू येत होते परंतू दोन तीन प्रयत्नातच माझ्या पतीचे नि दोडल साहेबांच्या कॅमेराचे चांगलेच सूत जुळले नि मग बघायलाच नको . काश्मीर आणि तेथील निसर्ग तर छायाचित्रकारांना भरभरून देणारा असल्यामुळे किती फोटो काढावेत असे होऊन जाते . माझ्या पतीने तर फोटोग्राफीची हौसच पूर्ण करून घेतली नि काश्मीरचा निसर्ग दोडल साहेबांच्या कॅमेरात मनसोक्तपणे बंदिस्त करून घेतला . आजही काश्मीरचे फोटो पाहताना दोडल साहेबांचा कॅमेरा आणि त्या कॅमेरामुळे झालेल्या गंमतीजमती आठवून हमखास हसू येते त्याचबरोबर दोडल साहेब व दोडल वहिनी यांचीही प्रकर्षाने आठवण येत असते .

१९८९ सालातला करामती कँमेरा नि त्यात टिपलेली अफलातून छबी.

Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या