पाऊस
पाऊस
नमस्कार रसिक वाचक,
बाहेर पाऊस पडत आहे तर मग भटकंती करायलाच हवी ना! चला तर मग आपापला पाऊस अनुभवू या. कुणाला गावाकडचा पाऊस खुणावतो, कुणाला पावसातली फजिती तर कुणाला प्रियकर प्रेयसी सोबतचा पाऊस आठवतो तर बळीराजाला त्याच्या कारभारणी सोबत रानातला पाऊस आठवतो. मला मात्र पावसाच्या पाण्यात मनसोक्त हुंदडणारे बालपण लाभले म्हणून पाऊस म्हणजे चैतन्याचा खराखुरा महासागर होय या महासागरात प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार उडी मारून आनंदाचे मोती गोळा करावेत त्याचसाठी हा लेखप्रपंच.
समोर पाऊस पडताना दिसतो परंतु हा पाऊस माझ्या मनाला कधीच स्पर्श करीत नाही. मनाला स्पर्श न करणारा असा हा शहरातला पाऊस देखील मला शहरासारखाच उपरा भासतो. शहरातला पाऊस देखील कर्तव्य म्हणूनच शहरात पडत असतो. तो देखील शहरात येतांना आपुलकी विसरूनच येत असतो. त्यालाही ठाऊक असते येथे अंकुरण्यासाठी आहेच काय! काँक्रिटच्या भिंतीवरून घरंगळून गटारीच्या पाण्यातच मिसळायचे आहे. त्यामुळे तो येतो फक्त कर्तव्य निभावण्यासाठी. आता तर विचारायलाच नको! आताशा तो कर्तव्य निभावण्यापुरता देखील यायला तयार नसतो. एखाद्या नवरदेवासारखा रुसून बसलेला दिसतो.
पावसाला ठाऊक असते की शहरातील माणसांच्या, वाहनांच्या व इमारतींच्या गर्दीत त्याला त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहचताच येत नाही तरीही तो गर्दीतून वाट काढीत काढीत मोठ्या कष्टाने पोहचण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याची घोर निराशा होते. चहूबाजूंनी गर्दीने वेढलेली त्याची प्रेयसी सर्वांसमोर त्याला भेटण्यास संकोचत असते. शेवटी तो आपल्या प्रेयसीला भेटण्याकरिता रानात जातो. तेथे मात्र ती त्याला पूर्णपणे समर्पित होते. पाऊस आपल्या सहस्र हातांनी तिला जखडून टाकतो. ती त्याच्या बाहूत अक्षरशः गुदमरून जाते. परंतु तो तिला सोडायला तयार नसतो. ती त्याच्या प्रेमात चिंब भिजून जाते. कवीच्या प्रतिभेला यातूनच धुमारे फुटून सहजच ओळी सुरांसह गुंजू लागतात,
चिंब पावसानं रान झालं आबादानी
त्या दोघांचा मिलन सोहळा बघण्यासारखा असतो. त्यांच्या त्या मिलन सोहळ्यातून सृष्टीच्या सृजनतेचा खरा साक्षात्कार होतो. पावसाचा व धरणीचा मिलन सोहळा साजरा करायला खेड्यातले लोक फारच आतुर असतात.
पाऊस व धरणी यांचे रानातले मिलन पाहून खेड्यातील माणूस आनंदाने नाचू लागतो. तो त्यांचा मिलन सोहळा साजरा करायला निघतो तेव्हा आपल्या बायका-पोरांना, शेळ्या-मेंढ्यांना व गाई-गुरांना घेऊनच जातो. नुकत्याच झालेल्या मिलनाने पुलकित झालेली धरणी तिच्या लेकरांना गोंजारण्याकरिता आतुर झालेली असते. तिची लेकरे तिच्याजवळ येताच ती त्यांचे लाड पुरवीत असते. तिची लेकरे तिच्या अंगाखांद्यावर उड्या मारू लागताच ती तिचे भिजलेले अंग आकसून लेकरांना तिच्यात सामावून घेते. तिची लेकरे उंच उंच आकाशाकडे झेप घेऊ लागतात तेव्हा वाटते ती त्यांच्या आकाशातल्या पित्याकडे झेप घेत आहेत. धरणीमातेची लेकरे पित्याला भेटण्यासाठी उंच उंच होत जाऊन आकाशात झेप घेऊ लागतात. त्यांचे ते वडिलांच्या दिशेने झेपावणे पाहून पिता-पुत्रांचे संबंध किती घट्ट असतात, याची प्रचिती येते. सदोदित जवळ असणारी आई आणि दूर असणारे वडील या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजेच त्यांची लेकरे होत. सृष्टीचा हा नियम सर्व प्राणिमात्राला लागू पडतो. असे हे धरणीमातेचे व पावसाचे मिलन पाहण्याची खरी मजा रानात व खेड्यात असते. असा हा रानातला व खेड्यातला पाऊस आपल्यालाही खऱ्या अर्थाने तृप्त करीत असतो. पावसाच्या जलधारांनी आपले मनही चिंब भिजून जात असते. याउलट शहरातला पाऊस माझ्या मनाला स्पर्शून जात नाही. कारण त्याचा मिलन सोहळा पाहायला जावे तर त्याच्या हातात फक्त धरणीमातेचा पदरच लागतो आणि धरणीमाता मध्येच कुठेतरी काँक्रीटच्या इमारतीत गडप झालेली दिसते. तेव्हा पाऊस हिरमुसतो. असा हा हिरमुसलेला पाऊस बघायला मन धजत नाही. परंतु शहरातला पाऊस माझे बालपण मला मिळवून देत असतो. हेही तितकेच खरे. मग मी पावसाच्या जलधारांबरोबर वाहत जाऊन केव्हा खेडेगावात पोहचते ते कळतच नाही.
पावसाबरोबर माझे मन खूप लांबचा प्रवास करून येत असते. खेड्यात धो-धो पडणारा पाऊस आठवतो. धो-धो पावसाबरोबर कडाडणाऱ्या विजा. गल्लीबोळातून वाहणारे मातकट पाणी. त्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी मुलंमुली. कदाचित कवी गुलजार यांनाही मुंबईसारख्या शहरात राहताना गावाकडची आठवण येऊन सहजच ओळी सुचल्या असतील,
वो बारिश का पानी, वो कागज की कश्ती
अर्थात या गाण्याचा भावार्थ खूप काही सांगत असला तरी शब्दार्थ मात्र सगळ्यांच्याच जीवनाशी निगडित आहे. मी मात्र पावसात किती कागदांचा (कागदाची नाव बनवून) बळी दिला असेल याची गणतीच करता येणार नाही. पाऊस पडायला सुरवात होताच आजोबा-आजी, मामा-मामी व मावशी या सगळ्यांना कागदाच्या होड्या बनवून देण्याच्या कामाला जुंपायची. एकापाठोपाठ एक अशा कागदाच्या होड्या पाण्यात सोडून किती दूरपर्यंत जातात ते पाहणे व कोणती होडी कडेला लागली, कोणत्या होडींची टक्कर झाली नि कोणती पाण्याच्या प्रवाहात लागलीच उलटी पुलटी झाली. हा सारा खेळ पाण्यात चिंब भिजत चालायचा. नदीला आलेला पूर. पुराबरोबर वाहून येणाऱ्या अनेक वस्तूंबरोबर बैल, म्हैस, शेळ्या व मेंढ्या यांसारखी जनावरे व त्यांना वाचवण्यासाठी चाललेली गावकऱ्यांची धडपड. सचैल स्नान केलेली झाडेझुडपे व पशुपक्षी असे सारे दृश्य शहरातल्या पावसाने माझ्या डोळ्यांसमोर आणून सोडले. शहरातला पाऊस मला मात्र खेड्यातल्या पावसाच्या आठवणींनी चिंब भिजवून टाकीत असतो. म्हणून म्हणावेसे वाटते पाऊस तो पाऊसच मग तो कोठेही पडो!
©ज्योत्स्ना पाटील
©ज्योत्स्ना पाटील
पाऊस,ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा 🌧🌈💃💃
ReplyDeleteधन्यवाद, नेहमीच बालपण आठवून देणारं गाणं!
Delete👌
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteManatala paus chhanch
ReplyDelete