वाघ आजी
नमस्कार रसिक वाचकांनो,
चला, आज फिलिपिन्स देशातूनही वाचक ब्लॉग वाचत आहेत याचा आनंद वाटतो. वाचन संस्कृती टिकून राहणार यावरचा विश्वास अधिक द्रुढ होत आहे. आजची भटकंती ही आपल्याच जवळच्या माणसांमध्ये करू या नि स्वतःलाही पुन्हा नव्याने तपासून पाहू या की, आपल्यातलं माणूसपण कितपत जीवंत आहे. आपणच आपापल्या फूटपट्टीने तपासून पाहू या.
आमच्या वाघ आजी
वीस वर्षांपूर्वी नाशिकला मेरी येथे राहायला आलोत. आमच्या 'राजमती' बिल्डिंगमध्ये वाघ साहेब आणि त्यांचे कुटुंब तळमजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहायला आले. त्यांच्या कुटुंबात दोघे पती-पत्नी, दोन मुले व व्रुद्ध आई होती. आम्ही सर्वजण वाघ साहेबांच्या आईला 'वाघ आजी'म्हणायचो. सकाळ झाली की आंघोळ करून चहापाणी घेतले की वाघ आजी ओट्यावर बसायच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी दोन शब्द बोलायच्या. त्यांचे दोन शब्द शाळेत जाणाऱ्या मुलांना व ऑफिसला जाणाऱ्या मोठ्यांना थोडेसे अडचणीचे ठरायचे कारण प्रत्येकाला वेळेची कसरत करीत शाळेची व ऑफिसची वेळ गाठावी लागायची.
एके दिवशी माझा मुलगा स्वप्नील घरी येताना थोडासा त्रासलेला दिसला, मी त्याला विचारले, "काय झाले रे बेटा?" थोडासा गुश्श्यातच म्हणाला, "काही नाही, आज शाळेत उशीरा पोहचलो म्हणून छडी खावी लागली." तू तर नेहमीच्याच वेळेवर निघाला होता तरी कसा काय उशीर झाला! गुश्श्यातच म्हणतो कसा, " खाली वाघ आजी बोलत होत्या, मला काही बोलणे शक्यच नव्हते. त्या माझ्याशी बोलत असताना कसा निघून जाणार नि मग झाला ना शाळेला उशीर."
मग मी त्याला हसून म्हणाले, "एवढेच ना!" मी असे म्हणताच तो अधिकच चिडला, "सगळ्यांसमोर छडी खावी लागली त्याचे काय!" बेटा, छडी खावी लागली म्हणून तुला अपमान वाटला पण तू एक चांगले काम ही केलेस. व्रुद्ध माणसांशी बोलायला आज घरात माणसं नाहीत. त्यांनाही कुणाशीतरी बोलावसं वाटतं. छडीपेक्षा आजीशी बोलल्यामुळे आजीला जो आनंद झाला तो लाखमोलाचा होता. तसेच अपमान पचवणारी माणसं नम्र असतात नि पुढे जाऊन ती स्वाभीमानी पण बनतात. ज्यांना अपमान पचवता येत नाही ती गर्विष्ठ आणि लोभीही तितकीच बनतात.
स्वप्नीलला त्यावेळेस माझं म्हणणं कितपत समजलं ते माहीत नाही पण त्यादिवसापासून तो आणि पूर्ती दोघेही शाळेत जाताना पाच मिनिट लवकर निघायचे नि वाघ आजीशी दोन शब्द बोलूनच शाळेत जायचे.
स्वप्नील पुण्याला गेल्यावर वाघ आजी आवर्जून त्याची चौकशी करायच्या. स्वप्नील पुण्याहून येताना आधी वाघ आजीची विचारपूस करायचा नि मग घरी यायचा. आजींना जिना चढणे शक्य नव्हते तरीदेखील आजी हात टेकत टेकत माझ्या घरी आल्यात आणि मला म्हणतात, "अगं सूनबाई तुझा मुलगा नि मुलगी किती गोड आहेत. आजकाल म्हाताऱ्यांशी बोलायला कुणालाच वेळ नसतो पण तुझी पोरं माझी आपुलकीने चौकशी करतात. त्यांचं बोलणं किती गोड आहे. खरंच किती गुणी मुलं आहेत. हे सांगण्यासाठी मी वरती आले. " आजीचे शब्द ऐकून खूप आनंद झाला. आपल्या मुलांचे कौतुक आपण करण्यापेक्षा इतरांनी करण्यातच खरा आनंद असतो. खूप गप्पा केल्यात आणि पोहे व शिरा करून आम्ही दोघींनी खाल्ला." आजीची सून नोकरी करून सासूबाईची सेवा करीत होती. मुलाने व सुनेने आजीची पंधरा वर्षांपासून सेवा केली नि काल आजीने शेवटचा श्वास घेतला. आजींना भेटून दोन वर्षे झाले होते पण आजही आजी ओट्यावर बसलेल्या डोळ्यांसमोर आल्यात नि नकळत डोळे भरून आलेत. आजींच्या आत्म्याला शांती लाभो!
©ज्योत्स्ना पाटील
मस्त
ReplyDeleteमनापासून धन्यवाद!
Delete