डिसेंबरमधील जिलेबी
सर्व रसिक वाचकांना २०१९ या वर्षातील शेवटची पोस्ट ही बालपणीच्या आठवणीत रमणार करणारी असावी या उद्देशाने लिहित आहे. प्रत्येकाला बालपणीत भटकंती करावीशी वाटते. प्रत्येकाच्या बालपणीच्या आठवणी वेगवेगळ्या असल्यात तरी सर्वांचे बालपण अनेक गंमतीजमतीनी बहरलेले असते. चांगल्या वाईट अशा घटनांनी आपले जीवन व्यापलेले असते. चला, आज वर्षाच्या शेवटी आपल्या बालपणात भटकंती करून नवीन वर्षात नव्या उमेदीने भटकंती करण्याचा निश्चय करू या.
डिसेंबरमधील जिलेबी
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा वर्षाचाही शेवटचा आठवडा आणि नाताळची धूम घेऊन येणारा आठवडा . कुणाला हा आठवडा ख्रिसमसच्या केकची आठवण करून देतो तर कुणाला सांताक्लॉजची सुंदर भेटीची आठवण करून देणारा असतो तर कुणाला चांगल्या वाईट क्षणांची आठवण करून देणारा असतो तर मला मात्र हा आठवडा गरमागरम जिलेबीची आठवण करून देत असतो .
आम्ही लहान असताना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आमची आई आम्हांला सर्वांना सकाळी सात वाजताच गरमागरम जिलेबी बनवून पोटभर खाण्यास दयायची . आम्ही चोघे बहीण भाऊ आणि दोन चुलत भाऊ जिलेबी खाताना कोण जास्त जिलेबी खाऊन दाखवितो अशी पैज लावायचो . पैज लावण्याच्या नादात आणि जिलेबी खाताना एखादया दिवशी शाळेत पोहचायला उशीर व्हायचा . शाळेत प्रार्थना सुरु असायची आणि आम्ही मात्र शाळेच्या गेटबाहेर प्रार्थना ऐकत उभे असायचो . प्रार्थना ऐकतच शाळेत वेळेवर पोहचलो नाहीत म्हणून आता कोणती शिक्षा होईल ? या चिंतेत आम्ही बहीण भाऊ एकमेकाला दोष देत बसायचो . तुझ्यामुळेच प्रार्थना चुकली असे एकमेकांवर आरोप करीत असतानाच आमचे पी .टी .चे शिक्षक हातात छडी घेऊन आमच्यासमोर उभे ठाकायचे . आईच्या हातच्या गरमागरम ,कुरकुरीत ,गोड जिलेबीची चव मस्तपैकी रेंगाळत असतानाच पीटीच्या शिक्षकांची जळजळीत नजर आणि छडीचा मार झेलताना मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे . कारण पीटीचे शिक्षक दुसरे तिसरे कुणी नसून आमचे वडीलच असायचे . आईच्या हातच्या गोड जिलेबीने आम्हांला मोहात पाडावे आणि त्या मोहाची किंमत वडिलांच्या हातच्या छडीने हात लाल करण्यात व्हावी अशा या अजब प्रकाराला जबाबदार असणारी जिलेबी डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात हमखास आठवते .
तीन दिवस ताकात मैदा व बेसनपीठ भिजवून नंतर एका गांधी टोपीला छिद्र पाडून त्यात ते पीठ भरायचे आणि तेलात गोल गोल वर्तुळ काढणारी आई जणूकाही वर्तुळ कसे काढावे ? हेच मूकपणे शिकवीत आहे असे वाटायचे .ती गरम तेलात जेव्हा जिलेबी तळायची तेव्हा तिचा चेहरा घामाने लालबुंद व्हायचा . वडिलांना कमी गोड जिलेबी आवडायची म्हणून आई सुरवातीच्या पातळ पाकातली जिलेबी काढायची त्यानंतर घट्ट पाकातली गोड जिलेबी आम्हां भावंडासाठी काढायची ,त्यातच सकाळी एखादे म्हातारे आजोबा वडिलांना भेटायला आलेत तर त्यांच्या कवळीचा विचार करून मोठे छिद्र असलेली टोपी घेऊन जाड जाड आकारातली जिलेबी काढून घरी आलेल्या आजोबांना देताना त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसायचे ते कल्पनातीत असायचे .
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात आमच्या घरी जणूकाही जिलेबीचे दुकानच थाटलेले असायचे . त्या काळात आमच्या घरची जिलेबी गल्लीतील सर्व शेजाऱ्यांकडे तर पोचायाचीच पण त्याचबरोबर आम्हां भावंडाचे मित्र मैत्रिणी आणि वडिलांना भेटायला घरी येणाऱ्या स्नेह्यांना गरमागरम जिलेबीचा आस्वाद मिळायचा . आईच्या हातची जिलेबी खाऊन अनेक आत्मे तृप्त झालेत आणि आम्ही भावंड तर इतके तृप्त झालोत की लग्नानंतर तर सासरी आल्यानंतर जिलेबी खावीशीच वाटली नाही . जिलेबी विकत आणून खाणे ही कल्पनाच मनाला पटत नाही आणि स्वतः जिलेबी बनविण्याच्या फंदातही मी कधी पडले नाही . कारण जिलेबी म्हणताच आठवतो तो आईचा घामाघूम झालेला लालबुंद चेहरा .थंडीच्या दिवसातही चुलीची ऊब सुखद वाटण्याऐवजी आईला मात्र ती दहकतेचे चटकेच देत असायची . आमच्या आनंदासाठी चुलीची दाहकता सहन करणाऱ्या आईला आज जिलेबी पाहताच तिच्या डोळ्यात टचकन पाणी येते . कारण मधल्या मामाच्या घरी आई भावासोबत रात्री ९ वाजता जेवण करीत असताना मामाने बहिणीसाठी जिलेबी आणली होती . जिलेबी खात असतानाच माझे मोठे मामा हे जग सोडून गेल्याची दुःखद वार्ता येऊन थडकली . माझी आई सर्व भावंडामध्ये मोठी मामाची दुःखद वार्ता ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले . माझा लहान भाऊ शेवटच्या घटका मोजत असताना मी जिलेबी खाल्ली याचे आईला नेहमीच वाईट वाटत असते . मोठ्या मामाच्या निधनानंतर आईने जिलेबीचा त्यागच केला .
ज्या जिलेबीने आईने अनेकांचे आत्मे तृप्त केलेत त्याच जिलेबिने आईला दुःखाचा झटका दयावा याला काय म्हणावे ! दैवाची क्रूर चेष्टा तर नव्हे ! आज कुठल्याही समारंभात आईसोबत पंगतीत बसताना जिलेबी घेऊन येणारा वाढपी जवळ येताच माझ्या काळजात धस्स होते . आणि मी आईच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे जाणूनबुजून टाळत असते . आईने जिलेबीला नकार देताच वाढपीला वाटते नक्कीच मधुमेहाचे रुग्ण असेल . त्याला बिचाऱ्याला कुठे ठाऊक असते माझ्या आईची भावस्पर्शी कथा आणि व्यथा . या विश्वातल्या कोणत्या गोष्टीशी माणसाचे कसे नाते जुळेल हे सांगणे मानवी आकलनापलिकडचे होय . हेच खरे .
©ज्योत्स्ना पाटील.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.