मनमोहक - दोनापावला बीच

 मनमोहक - दोनापावला बीच 
             
              गोवा म्हणताच डोळ्यांसमोर निळाशार समुद्र, उंचच उंच ताडामाडाची झाडे, आंब्या - फणसांची झाडे असे चित्र तरळून जाते. गोव्यातील समुद्रकिनारे म्हणजे संपूर्ण जगाचे दर्शन घडविणारे ठिकाण होय. गोव्याचा समुद्रकिनारा चित्रकाराला जसा आव्हान देतो, तसाच तो कवींनाही कविता लिहिण्यास भाग पाडीत असतो, तर छायाचित्रकाराला नवनवीन वेगवेगळ्या पोझ द्यायला नेहमीच तयार असतो. अनेक रंगगंधांचा समसमा संयोग जर कुठे होत असेल तर तो म्हणजे गोव्याच्या भूमीत. 
            गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याला समुद्रकिनारा किंवा चौपाटी म्हणणे तसे प्रशस्त वाटत नाही. कदाचित हा तेथील वातावरणाचाच  एक भाग असावा. गोव्यातील समुद्रकिनाऱ्याला 'बीच' म्हणणेच योग्य होय. हे तेथील वातावरण पाहिल्यावर जाणवल्याशिवाय राहत नाही. इंग्रजी भाषेतील एकाच शब्दाचा उच्चार किती प्रकारे कानांवर पडेल हे मोजायचे असेल तर त्यासाठी गोव्यातील बीच नक्कीच पायदळी तुडवावेत तरच ते लक्षात येईल. गोव्यातील बीचची तऱ्हाही मुंबईच्या चौपाटीसारखीच होय. 
            गोव्याचा 'दोना पावला बीच' हा मुंबईच्या 'गेट वे ऑफ इंडियाची' आठवण करून देत असतो. कारण  'गेट वे ऑफ इंडिया' प्रमाणे 'दोना पावला बीच' चीही रेतीशी फारकत झालेली.  'गेट वे ऑफ इंडिया' प्रमाणे 'दोना पावला' बीचवर समुद्राच्या रेतीचा किंवा फेसाळत्या पाण्याचा आनंद पर्यटकांना लुटणे शक्य नसते. या बीचवर जो काही आनंद लुटायचा तो फक्त गर्जना करणाऱ्या लाटांचा. दोनपावला बीच म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरील छोट्याशा टेकडीचा कलात्मकतेचा उत्कृष्ट नमुना होय. येथील छोट्याशा टेकडीचा ज्या कलात्मकतेने वापर केला आहे ते पाहून मन आनंदून जाते. या टेकडीवर उभे राहून दूरपर्यंत समुद्र न्याहाळणे एक सुखद अनुभूती असते. टेकडीला धडका मारणारा विशाल समुद्र आणि त्या धडकांना समर्थपणे तोंड देत उभी असलेली टेकडी पाहिली की वाटते, या दोघांमध्ये समर्थ कोण? असा प्रश्न 'दोना पावला बीच' वर प्रत्येक वेळेस आल्यावाचून राहत नाही. या बीचवरील टेकडी मला एखाद्या स्थितप्रज्ञ ऋषीमुनी सारखी वाटते तर खवळलेला अक्राळविक्राळ समुद्र एखाद्या राक्षसासारखा वाटतो. करूणा आणि क्रौर्य यातील द्वंद सतत चालू असते याचा प्रत्यय मला या बीचवर प्रत्येक वेळेला येत राहिला. 
        'दोना पावला बीच' वर रेतीत बसून समुद्र न्याहाळण्याचा आनंद जरी लुटणे शक्य नसले तरी बोटीत बसून समुद्रसफारीचा आनंद मात्र लुटता येत असतो.   'दोना पावला बीच' म्हणजे समुद्रात मुसंडी मारणारा कोलंबसासारखा धैर्यशाली खलाशीच होय. त्याच्या तिन्ही बाजूंना  पाण्याने वेढा घातला आहे तर एका बाजूला शहराकडे जाणारा रस्ता. असा हा बीच समुद्रकिनाऱ्यावरील शहराचे दर्शनही घडवीत असतो.
©ज्योत्स्ना पाटील    


अठरा वर्षापूर्वी दोना पावला बीचवरील एका रमणीय संध्याकाळी दिलिपसोबत.


Comments

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या