ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला
देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना,
ज्योत्स्नाचा नमस्कार.
बऱ्याच दिवसांपासून पोस्ट टाकली नाही म्हणून काही वाचकांनी फोन करून तर काही वाचकांनी मेसेज करून विचारणा केली तेव्हा खूप आनंद झाला कारण वाचन-संस्कृती टिकून आहे. असो,
चला तर मग आज अशाच एका किल्ल्याची सैर करू या. ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली असेल त्यांनी आपल्या स्मृतींना उजाळा देऊन आनंद घ्यावा नि ज्यांनी या किल्ल्याला भेट दिली नसेल त्यांनी कल्पनेनेच तेथे जाऊन सैर करण्याचा आनंद लुटावा हाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू। चला, तर मग एक फेरफटका गोव्याला मारून येऊ या
ऐतिहासिक वास्तू - अग्वाद किल्ला
गोवा म्हणताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो समृध्द निसर्ग आणि तेही समुद्राची गाज घेऊनच. समुद्राने गोव्याला फक्त बीचच दिले असे नव्हे तर तेथील लोकांना व्यवसाय आणि भरभरून अर्थसंपत्तीही बहाल केली आहे. गोव्याचे अर्थकारण नेहमीच भरभराटीला ठेवण्याचे काम तेथील बीच करीत असतात . असाच एक गोव्यातील 'अग्वाद बीच', अग्वाद बीचला 'अग्वाद जेल', 'अग्वाद किल्ला' अशा तीन नावांनी संबोधले जाते. कारण अग्वाद बीचला लागूनच जेल आणि किल्ला असल्यामुळे ही तिन्ही विशेषणे या बीचला चिकटली ती कायमचीच. किल्ला, जेल आणि ताज हॉटेल या तीन वैशिष्ट्यांमुळे 'अग्वाद बीच' प्रसिध्द आहे. अग्वाद बीचला ताज हॉटेलची सोबत लाभलेली आहे. ताज हॉटेलचा चकचकीत परिसर आणि अग्वाद किल्ला म्हणजे जुन्या नव्याचे उत्कृष्ट मिश्रण होय. अग्वाद किल्ल्यावरून समुद्राचे रूप न्याहाळताना आपण भूतकाळात जाऊन पोहचतो. महाराष्ट्रात 'किल्ला' असा शब्द उच्चारताच आम्हांला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. येथे मात्र हा किल्ला गोव्यातील लोकांनी जरी बांधला असेल तरीदेखील तेथे राज्य मात्र पोर्तुगीजांचे असल्यामुळे त्यावर अधिकार हा पोर्तुगीजांचा असल्यामुळे हा किल्ला आपल्याच मराठी बांधवांना लक्ष्य करणारा होता याची कुठेतरी सल या किल्ल्यावर फेरफटका मारताना होत होता पोर्तुगीजांनी आपल्याच स्वकीय बांधवांना तर टिपले नसेल ना! या विचारसरशी अंगावर काटा उभा राहतो. पोर्तुगीजांनी हा किल्ला डच व मराठ्यांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बांधला होता. पोर्तुगीज भाषेत 'अग्वाद' म्हणजे 'पाण्याची जागा' होय. अशा या 'अग्वाद किल्ल्यात' समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूला टिपण्यासाठी असलेल्या बोगद्यांमध्ये आज प्रेमी युगुल बसलेले दिसतात. काळाचा महिमा असे समजून समुद्राच्या लाटांवर नजर स्थिरावते. दोनापावला बीचवर टेकडीला धडका मारणारा समुद्र येथे मात्र किल्ल्याला आपल्या बाहूत कवटाळायला पाहतो. इतिहासाची साक्ष देत समुद्र किनाऱ्यावर एकनिष्ठतेने ठाण मांडून बसलेला 'अग्वाद किल्ला' म्हणजे एक मजबूत ऐतिहासिक वास्तू होय.
अग्वाद किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागताच एकेकजण किल्ल्यातून बाहेर पडू लागतात. अग्वाद किल्ल्यावर जास्त वेळ बसणे तसे शक्य नसते. कदाचित किल्ला हा युद्ध करण्याकरिताच असावा असा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असल्यामुळे अग्वाद किल्ल्यावरून सृष्टी सौंदर्य पाहणे शक्य होत नसावे असे असले तरीदेखील किल्ल्यावरून समुद्राला न्याहाळण्याची मजा काही औरच होय. येथे मात्र आपण उंचावर असल्यामुळे लाटांचे फारसे भय वाटत नाही. एक एक लाट मोठ्या वेगाने येते आणि किल्ल्याजवळ येताच किल्ल्याला शरण आल्यासारखी भासत असते. जणूकाही तिचा त्वेष थोडाच वेळ टिकतो आणि किल्ल्यापुढे ती अगदीच नामोहरम होऊन जाते. 'अग्वाद किल्ला' समुद्राच्या लाटांशी दोन हात करीत [समर्थपणे उभा आहे.
मीरामार बीचवर किंवा कलंगुट बीचवर रेतीत बरीच पायपीट करून आलेले पर्यटक अग्वाद बीचवर रेतीचा स्पर्श अनुभवायला कंटाळतात, बरेचसे पर्यटक अग्वाद किल्ल्यावरूनच समुद्राचे रूप न्याहाळून परतीच्या प्रवासाला लागतात. अग्वाद बीचवर भूत, वर्तमान अनुभवून भविष्याकडे वाटचाल करायला आपण मोकळे होतो आणि पुढील बीचच्या प्रवासाला सुरवात होते.
©ज्योत्स्ना पाटील
Thanks।
ReplyDelete