तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....
चला, आज थोडी वेगळ्या वाटेने म्हणजेच निसर्गासोबत तेही घरातल्याच निसर्गासवे भटकंती करून येऊ या!
तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....!
तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....!
पुणे व बारामती येथे १९ ऑगस्ट २०११ ला गेलो होतो. दोन दिवसांनी म्हणजेच २१ ऑगस्ट २०११ ला सायंकाळी साडे सात वाजता घरी पोहचलो. घरी येताच सर्वांना चहा करण्याकरिता मी किचनमध्ये येताच किचनच्या खिडकीसमोर खूप मोठा काळ्या आकाराचा डोंगरच चिकटलेला दिसला. त्या डोंगराला पाहताच प्रथम मी घाबरलेच. अरे बाप रे! हे काय लागले आहे आपल्या घराला असे वाटून जास्तच घाबरले नि आमच्या महाशयांना जोरात आवाज दिला, "पाटील साहेब इकडे या. हे बघा काय आहे येथे!" असे म्हणत मी बारकाईने पाहिले तर मधमाश्यांनी पोळं बनविण्यास सुरवात केली होती. हजारो मधमाश्यांना एकाच जागी आणि तेही इतक्या जवळून पाहून मला खूपच आश्चर्य वाटले. दोनच दिवसांत हजारो मधमाश्या कुठून आणि कशा आल्यात? या प्रश्नाने डोक्यात चांगलेच थैमान घातले होते. छताला चिकटलेल्या या मधमाश्यांनी उलटा डोंगरच माझ्या डोळ्यांपुढे तयार करून ठेवला आणि जणुकाही त्या मला सांगू लागल्या, "बघ, आमची करामत!' त्यांची ती करामत पाहणे जणुकाही माझा रोजचा छंदच झाला. सकाळी उठताच चहा करताना त्या माझ्यासमोरच ठिय्या मारून बसलेल्या. सकाळपासून ते रात्री संपूर्ण किचन ओटा आवरून झोपेपर्यंत त्या माझ्यासमोरच ठाण मांडून बसलेल्या असत. दिवसभर मधमाश्यांची ये-जा चालूच असायची; परंतु कोणत्या माश्या बाहेर गेल्यात आणि कोणत्या परत आल्यात, याचा काहीच थांगपत्ता त्या लागू देत नव्हत्या. जणुकाही त्या माझ्याशी लपाछपीचा डाव खेळून मला चकवत तर नाहीत ना! असे सारखे वाटत असे. एकमेकींच्या अंगावरून अगदी मजेत चालणाऱ्या मधमाश्यांचा हेवा करावा तितका कमीच आहे. नाही तर आम्ही माणसे शेजारी बसलेल्या माणसाचा थोडासा जरी धक्का लागला तरी हमरीतुमरीवर येतो आणि येथे तर एकेकीच्या अंगावरून किती मधमाश्या जातात नि येतात, याचा ताळा करणे काही शक्य होत नाही.
पंधरा-वीस दिवसानंतर मात्र मधमाश्यांनी बनविलेला डोंगराचा आकार अर्धवर्तुळाकार होऊ लागला. त्यांनी जवळजवळ ३५-४० सें. मी. व्यासाचे अर्धवर्तुळ बनविले. त्यांनी बनविलेले अर्धवर्तुळ हे वाऱ्याच्या दिशेला जाणूनच बनविले होते कारण कितीही सोसाट्याचा वारा आला, तरी त्या पोळ्याला यत्किंचितही वाऱ्याची झळ पोचत नव्हती. मधमाश्यांचे भौगोलिक ज्ञान आमच्यापेक्षा चांगलेच उच्च दर्जाचे होते, यात तिळमात्र शंका नव्हती. आमचे पाटील साहेब व लेक येता-जाता मला चिडवत असत, "काय म्हणतात तुझ्या मैत्रिणी?" अर्थात त्यांचे चिडवणे योग्यच होते. मला मधमाश्यांच्या सहवासाची चांगलीच सवय झाली होती. त्यांचे निरीक्षण करण्यात वेळ कसा जायचा ते कळतही नव्हते. सुरवातीला माझ्या कुकरच्या शिट्टीला घाबरून पाळणाऱ्या मधमाशा नंतर मात्र घाबरेनाशा झाल्या. कधी कधी मधमाश्यांच्या या पोळ्याची खूपच हालचाल व्हायची आणि असे वाटायचे की, आईच्या गर्भातल्या बाळानेच हालचाल केली की काय! असा भास व्हायचा. त्यांच्या त्या हालचालीने पोटात कसे धस्स व्हायचे. पोळे व माशा धप्पकन खाली पडतात की काय! सुदैवाने असे काही व्हायचे नाही नि मग मी सुटकेचा निःश्वास सोडायचे. दोन महिन्यात मधमाश्यांनी बरेच मध साठवले आणि आमच्या या मधमाश्यांचा शेजारच्यांना त्रास होऊ लागल्यामुळे ते काढून टाकावे, असे सर्वांच्या संमतीने ठरले. मधाचे पोळे काढणाऱ्या माणसांना पाचारण करण्यात आले. बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच २१ ऑक्टोबर २०११ ला मधमाश्यांच्या या पोळ्यावर माणसांच्या हाताची कुऱ्हाड चालली आणि तिने त्या सर्व मधमाश्यांना छाटून टाकले. पोळ्यापासून मधमाश्यांना ओरबाडून काढले ते दृश्य फारच भयानक होते. आजही ते दृश्य आठवले तरी काळजात चर्र होते. दोन महिन्यांपासून रात्रंदिवस कष्टणाऱ्या मधमाश्यांचे श्रम निर्दयी माणसाने चिरडून टाकलेत. निसर्गाच्या सर्जनशीलतेला ज्ञानी व स्वार्थी माणसाने छिन्नभिन्न करून टाकले. दिवसभर मधमाश्यांच्या विचाराने मन खंतावले. किती मधमाश्यांना जीवदान दिले असेल आणि इतर माशा कुठे गेल्या असतील? अशा विचारांनी डोक्यात थैमान घातले होते. २२ ऑक्टोबरला सकाळी किचन ओट्याजवळ जाताच खिडकीबाहेरची जागा निर्जीव व भेसूर वाटू लागली. काळापर्यंतचे चैतन्य कुठे गायब झाले होते! सकाळच्या चहाची मजाच गेली. त्यानंतर जेव्हा मी किचन ओट्याजवळ जायचे तेव्हा मला मधमाश्यांच्या आठवणीने अपराधीपणाची भावना बळावयाची आणि अचानक एके दिवशी खिडकीबाहेर मधमाशा घोघावताना दिसल्या. पुन्हा त्याच जागी मधमाश्यांना पोळे बनविण्यास सुरवात केली. तो दिवस होता ११ नोव्हेंबर २०११ आणि वेळ होती सकाळी अकराची. सारी प्रसारमाध्यमे ऐश्वर्या रॉय-बच्चनच्या बाळाची प्रतीक्षा करीत असताना मी मात्र मधमाश्यांच्या पुनरागमनाचा आनंदोत्सव साजरा करीत होते. अर्थात, माझा आनंद काही दिवसांपुरताच होता, याची जाणीवही झाली; परंतु खंतावलेल्या मनाला मधमाश्यांचे पुनरागमन फक्त तीन आठवड्यांपुरतेच लाभले होते. त्या पुन्हा ४ डिसेंबर २०११ ला पोळे सोडून निघून गेल्यात. मधमाश्यांचे जाणे यावेळेस मला क्लेशदायक नव्हते कारण त्या आपल्या मर्जीने आल्यात आणि आपल्या मर्जीने पोळे सोडून गेल्यात. कदाचित त्या माझी समजूत काढण्यासाठीच तर आल्या नव्हत्यात ना! असे सारखे वाटायचे. त्या जरी यावेळेस माझ्यापासून दूर गेल्या होत्या पण जाताना त्या माझ्यासाठी एक सुंदर भेट देऊन गेल्यात. त्या त्यांचे पोळे माझ्या खिडकीसमोर पांढऱ्या शुभ्र रंगांचे पोळे मला भेटीदाखल देऊन गेल्यात. ते पांढरे शुभ्र पोळे म्हणजे माझ्या घराला लाभलेले नैसर्गिक झुंबरच होय. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते पांढरे पोळे इतके आवडते की, त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, "अरे वा! मधमाश्यांचे पोळे असे असते का!" मधमाश्यांचे निसर्गरूपी झुंबर मला नेहमीच त्यांची आठवण करून देत असते. जणुकाही त्या म्हणत असतात, 'तेरे घर के सामने, एक घर बनाऊँगी.....!'
सात-आठ महिन्यानंतर मात्र त्यांच्या घराला पक्ष्यांनी टोच मारून दोन ठिकाणी इजा पोचवली नि मन खट्टू झाले. वाटले मधमाश्यांनी पुन्हा यावे नि त्यांच्या पोळ्याला गोकुळाचे रूप देऊन सजीव करून टाकावे. मी प्रतीक्षा करीत होते मधमाश्यांच्या येण्याची नि त्या पुन्हा आल्यात. असा हा मधमाश्यांचा सिलसिला चालूच आहे.

Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.