नमस्कार रसिक श्रोत्यांनो,
कोरोनाने जगभर काहूर माजवले आहे नि माणसांची मती कुंठित झाली आहे. अशावेळेस स्वतःला आशावादी ठेवून स्वतःची व इतरांची काळजी कशी घ्यायची? हा आपल्या सर्वांसमोर पडलेला प्रश्न आहे. परंतु प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच. जेथे प्रश्न आहे तेथे उत्तर हे असणारच हे लक्षात घेऊन आजच्या समस्येवर मार्ग काढू या. काही कोरोनाबाधित लोकांना भीती वाटते ती एकटे राहण्याची पण अशावेळेस मला मात्र माझ्या वडिलांनी सांगितलेले वाक्य आठवते आणि ते बळही देत असते. कोणतीही समस्या जेव्हा समोर उभी ठाकते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, "माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो." खरे तर वरवर पाहता हे वाक्य निराशावादी वाटण्याची शक्यता आहे पण त्याच्या मुळाशी गेले की लक्षात येते की, माझी अडचण, माझी समस्या ही माझी आहे आणि तिला सामोरे जाणे, त्यावर मार्ग शोधणे हे माझेच काम आहे. त्यांच्या या एका वाक्याने दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अपेक्षा कधीच केली नाही. कदाचित यामुळेच धीर, संयम हे गुण आपोआपच येत गेलेत.
मला वाटते, करोनाबाधित बांधवांनी न घाबरता, एकटेपणाचे भय न बाळगता आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊन कोरोनाचा पराजय करावा.
आपल्या जीवनाचे आपणच शिलेदार आहोत. असे मनाला बजावित करोनावर मात करावी.
जगातील सर्वच बांधवांना निरामय जीवन लाभावे, अशी प्रार्थना करू या!
कोरोना तू आलास
जगायला शिकवलंस
माणसाचा वृथा अहंकार
गाडायला शिकवलंस
माणसातला माणूस
जपायला शिकवलंस
जगण्याचं मोल
जाणायला शिकवलंस
तुझ्या शिकवणुकीची
दक्षिणा मात्र खूप मोजली
आता तरी आल्या पाऊली जा....!
आता तरी लोकांचा
अंत नको पाहूस,
अंत नको पाहूस......!
सारे मिळूनी आशा करू या की, लवकरात लवकर या भूतलावरून कोरोनाचे उच्चाटन होऊन हे जग निकोप व निरामय होवो!
©ज्योत्स्ना पाटील.
Comments
Post a Comment
Lekhavishayi apale mat deu shakatat.