खाली पडलेला मोबाईल
खाली पडलेला मोबाईल
गेल्या वीस वर्षांमध्ये प्रवास करताना आम्हांला तीन मोबाईल सापडलेत आणि हे तिन्ही मोबाईल सुखरूपपणे त्यांच्या मालकांपर्यंत पोहचते करताना जो काही त्रास झाला तो आम्हांलाच ठाऊक आहे. त्यातलाच हा एका मोबाईलचा अनुभव!
दि. २५ सप्टेंबर २०१३ रोजी मी व माझे पती अशोक स्तंभाकडून एस. टी. कॉलनीकडे येत असताना दिवट्या बुधल्यांच्या सर्कलजवळ आमच्या गाडीच्या पुढेच रस्त्यावर एक मोबाईल खाली पडला. मोबाईल आमच्या गाडीच्या पुढे जाणाऱ्या रिक्शेतून पडला होता. मोबाईल आमच्या कारच्या चाकाखाली येणार तितक्यात दिलिपने मागच्या गाड्यांचा अंदाज घेत गाडी वळवली आणि गाडीखाली येणाऱ्या मोबाईलला मोठया शिताफीने वाचविले. मोबाईल तर सहीसलामत राहिला परंतु वाचवलेला मोबाईल त्याच्या मालकाकडे पोहचविण्याचे काम करणे भाग होते म्हणून आम्ही गाडी थांबवली आणि मागच्या गाडयांनाही ब्रेक दाबण्याशिवाय पर्याय नव्हता. गाडी थांबताच मी गाडीतून उतरले आणि रस्त्यावर पडलेला मोबाईल उचलला. मोबाईल उचलत असताना रस्त्यावरील प्रवाशांच्या नजरा खूप काही बोलून गेल्यात. कुणाला वाटले, मला फुकटचा मोबाईल हवा म्हणून मी तो घेण्यासाठी गाडीतून उतरले तर कुणाला वाटले, माझ्याऐवजी या बाईने मोबाईल बळकावला तर कुणाला करकचून ब्रेक दाबून गाडी थांबवावी लागली म्हणून कपाळावर आठयांचे जाळे. अशा सर्व प्रकारच्या नजरा झेलत मी मोबाईल उचलला. मोबाईल तर उचलला परंतु त्यानंतर खरी कसरत होती ती म्हणजे ज्या व्यक्तीचा मोबाईल होता त्या व्यक्तीच्या हातात तो पोहचता करण्याची म्हणून आमच्या पुढे असणाऱ्या रिक्शेचा पाठलाग केला. रिक्शेचा पाठलाग करताना दिलिपने रिक्शा चालकाला हॉर्न वाजवून रिक्शा थांबविण्याचा इशारा केला परंतु रिक्शा चालक काही रिक्शा थांबवायला तयार नव्हता. दिलिपने रिक्शेच्या पुढे गाडी नेऊन रिक्शा चालकाला रिक्शा थांबविण्यास सांगितले तरीदेखील तो रिक्शा थांबविण्यास तयार नव्हता. दिलिपने शेवटी त्याच्या रिक्शेच्या पुढे गाडी आडवी करताच रिक्शा चालकाने रिक्शा नाईलाजास्तव थांबवली. रिक्शेत डाव्या बाजूला बसलेल्या प्रवाशाला विचारले, तुझा मोबाईल कुठे आहे? तेव्हा तो गोंधळला आणि स्वतःच्या जाकीटचे खिसे चाचपू लागला आणि खिसा रिकामा पाहून चांगलाच घाबरला. दिलिपने त्याला मोबाईलच्या कंपनीचे नाव, रंग व कव्हरविषयी विचारून घेतले. अर्थात मोबाईल त्या व्यक्तीच्या खिशातून पडताना आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते म्हणून फार काही चौकशी करण्याची गरज भासली नाही. त्या व्यक्तीला मोबाईल परत केला असता त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो आनंद पाहून मघाशी माझ्याकडे जळजळीत नजरेने पाहणाऱ्या लोकांविषयी मला काहीच वाटले नाही.
©ज्योत्स्ना पाटील
Nice......
ReplyDeleteधन्यवाद विशाल सर
Delete