सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा
सिक्कीमच्या भूमीत केलेला मूर्खपणा
आपल्याकडून कधीकधी जी चूक होत असते ती आठवल्यावर आपल्यालाच हसू येत असते. अशीच एक चूक माझ्याकडून सिक्कीमच्या भूमीत झाली आणि आजही आठवण येताच माझे मलाच हसू येत असते. अर्थात अशी चूक माझ्याकडून झाली नसती तरच नवल घडले असते कारण निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर मी माझी राहतच नाही. निसर्गाचं नि माझं कोणतं असं अतूट नातं आहे ते मलाही कळत नसते. सिक्कीमचा निसर्ग तर बघायलाच नको! हिमालय पर्वताच्या उंचचउंच रांगा, खोल दऱ्या नि त्यातून वाहणाऱ्या नद्या आणि नद्यांच्या पाण्याचे झालेले बर्फ, उंचचउंच झाडी नि तितकीच शांतता! अशा या निसर्गरम्य परिसरात वावरताना आपणही तितकेच निरागस बालक झालो नाहीत तर आपल्याइतके कर्मदरिद्री कुणीच नसावे, असे माझे प्रामाणिक मत आहे.
आम्ही भल्या पहाटे उठून पेलिंग सोडले आणि 'लाचुंग' येथे जाण्यासाठी निघालो. निघण्यापूर्वी पेलिंग येथून आम्ही कोट, ग्लोव्हज, वुलनचे तेथील वातावरणाला अनुकूल होतील असे कपडे सर्वांनी भाड्याने घेतलेत. आमचे स्वतःचे थर्मल, टी शर्ट, जाकीटस घातलेले असूनही तेथील वातावरणाला अनुकूल असणारे कपड्यांचा थर अंगावर चढवूनही आम्हांला जी काही थंडी वाजत होती तेव्हा तेथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना मी मनोमन सलाम केला. आपल्याकडे तापमान आठ-नऊ डिग्रीला पोहचताच प्रत्येकजण थंडीच्या नावाने जे काही बोलत असतो तेव्हा प्रत्येकाने लाचुंगला नक्कीच जाऊन यावे. कारण उत्तर ध्रुव-दक्षिण ध्रुवावर सगळ्यांनाच जाता येत नाही म्हणून आपल्याच देशातील भिन्न भिन्न वातावरणाचा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवे. उत्तर भारत व ईशान्य भारत येथील थंडीची मजा घ्यायलाच हवी. तर अशा या थंडीची गंमत म्हणजे आमच्या अंगावरील कपड्यांच्या थरांनाही न जुमानणारी थंडी व आमची त्या वातावरणाशी अनुकूल होण्याची परिस्थिती पाहूनच आमचे टूर मॅनेजर केल्टन परेरा व संतोष या दोघांनी आम्हांला लाचुंगच्या नदीपात्रात फक्त अर्धा तास फिरण्याची संधी दिली तेव्हा आम्हांला दिलेला वेळ किती कमी आहे असे वाटले परंतु प्रत्यक्षात तेथे गेल्यावर लक्षात आले की आपण उष्ण प्रदेशात राहणारी जमात त्या थंडीशी कितपत सामना करू शकतो हे त्या दोघांनाही चांगलेच ठाऊक होते.
माझा फोटो बारकाईने पाहिल्यावर मी कोणता मूर्खपणा केला असेल याची पुसटशी कल्पना नक्कीच आली असेल. मी नेमका उजव्या हातातील ग्लोव्हज काढला कारण पाटील साहेबांचा फोटो क्लिक करण्याकरिता मी मोबाईल हातात घेतला पण ग्लोव्हजमुळे फोटो क्लिक करणे शक्य होत नव्हते. शेवटी ग्लोव्हज काढून फोटो क्लिक केला आणि मोबाईल पाटील साहेबांना देऊन मी लहान मुलासारखा नदीपात्रातला बर्फ काढला आणि वरती हवेत भिरकावून देताच हातात बर्फ झेलण्याचा मूर्खपणा केला आणि तळहाताला पाच-सहा ठिकाणी बर्फाने चांगलेच कापून काढले नि हातातून रक्त व्हायला लागले. जखमांबरोबरच तळहाताला थंडीचाही तडाखा बसला नि भयंकर वेदना होऊ लागल्या. माझ्या तळहाताला बर्फाने कापल्याबरोबर केल्टन व संतोष दोघेही गाडीकडे पळालेत नि प्रथमोपचाराचे सामान घेऊन आलेत आणि डेटॉल लावून व कापसाचा बोळा दाबून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला नंतर मलम वगैरे लावून उपचार केलेत. अर्थात धरणी मातेने पांढरी बर्फाची चादर ओढलेली पाहून मन इतके हरखून जाते की आपण कोण आहोत हेच कळेनासे होते. असे वाटते की सुसाट धावावे नि जिकडे वाट दिसेल तिकडे पळावे नि सर्व नजारा डोळ्यात भरून घ्यावा.
लहान मुलांना आगीला हात लावू नकोस, बर्फाला हातात धरू नकोस असे मारे मोठ्या आविर्भावात सांगत असतो नि स्वतः मात्र पाण्याचा बर्फ हा करवतीसारखा असतो हे माहीत असूनही मस्तपैकी हातात झेलण्याचा मूर्खपणा करतो तेव्हा स्वतःवर हसण्याशिवाय पर्यायच नसतो. आजही हा फोटो पाहताना मला माझ्या मूर्खपणावर हसू येते आणि आपल्यातला बालक जिवंत आहे याचा आनंद वाटतो.
तुम्ही जर कधी 'लाचुंग' ला किंवा हिमालय पर्वताच्या कोणत्याही ठिकाणी गेलात तर नदीपात्रातला किंवा पर्वतावरचा बर्फ चुकूनही हातात घेऊ नका आणि हातात घेतला तर वरती फेकल्यावर झेलण्याचा प्रयत्न तर चुकूनही करू नका.
तळहाताला जखम झाली पण निसर्गाचा जो अद्भुत नजारा पाहायला मिळाला त्यात त्या जखमांचे दुखणे जाणवलेही नाही. हिमालय पर्वतात वास्तव्य करणारे लोक काटक का आहेत तर निसर्गाच्या सान्निध्यामुळे नि प्रदूषणविरहित वातावरणात वास्तव्य केल्यामुळे. लाचुंगचा निसर्ग मनाच्या कप्प्यात साठवीत पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालोत. आजही ती नदी, पर्वत, दऱ्याखोऱ्या व झाडे सारे काही डोळ्यांसमोर उभे राहते नि मन निसर्गापुढे नतमस्तक होत असते.
©ज्योत्स्ना पाटील

अहमद सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!
ReplyDelete