श्रीजाचे जावळ नि आमच्या गप्पा
आठ दिवसांपूर्वी दिपश्रीला फोन केला असता आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मला नेमकी तिच्या छोट्या मैत्रिणीची आठवण आली नि मी तिला विचारले, "तुझी टिल्लू, काय म्हणते?" असे विचारताच दिपश्री उत्साहाने म्हणाली, "अहो आई, तिचे जावळ काढले तर ती आता खूपच वेगळी दिसते. आधी ती किती छान दिसायची नि आता तिचे केस काढलेत तर खूपच वेगळी दिसते. बाळ लहान असतानाच बाळाचे जावळ काढायला हवे." तिचे श्रीजाच्या जावळाविषयीचे बोलणे ऐकताच मला हसूच आले. दोन तीन महिनाचे बाळ किती नाजूक असते नि त्यात बाळाला पुरेसे जावळ न येताच बाळाच्या कोवळ्या डोक्यावर कैची चालवणे शक्य तरी होईल का? "अगंबाई, बाळ बसायला लागल्यावर आणि त्याच्या डोक्यावर एक वर्षानंतरच बाळाचे जावळ काढतात." मग काय बाईसाहेब स्वतःच्या जावळ काढण्याच्या कल्पनेवर स्वतःच हसायला लागल्या. "श्रीजा जावळ काढताना रडली होती का गं?" मी असे विचारताच ती पुन्हा हसायला लागली. "आमचे हे नव्हते का, श्रीजाच्या पप्पांना मार्गदर्शन करायला. अहो आई हे सुमीतला इतके भारी सांगत होते की जसे काही चार-पाच पोरांचे पप्पा आहेत की काय! अशा आविर्भावात ते सुमितला सांगत होते. मला खूप हसायला येत होते. अरे तिचे जावळ काढायला जिरो मशीन वापरशील तर ती रडेल त्यामुळे तू चार-पाच दिवस आधीपासूनच तिच्या डोक्याभोवती जिरो मशीनचा आवाज करीत राहा मग तिला त्या आवाजाची सवय होऊन जाईल आणि ती जावळ काढताना रडणार नाही. आई, हे सुमितला इन्स्ट्रक्शन देत होते नि मला हसू येत होते. अशी त्या श्रीजाच्या जावळाची गंमत चालू होती. एकदाचे काढले तिचे जावळ आणि आपली खोबऱ्याची वाटी तिचे जावळ ठेवायला उपयोगी पडली."
मीही दिपश्रीला गंमतीने म्हटले, "बघितलं का तुझ्या नवऱ्याचे लॉजिक कसे, कुठे उपयोगी पडते म्हणूनच तो सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला." पुन्हा बाईसाहेब हसायला लागली नि मला म्हणते कशी, "कधीकधी नको तिथेही लॉजिक लावतात हं." पुन्हा आम्ही दोघीही खळखळून हसलोत. अशाप्रकारे स्वीडनमध्ये श्रीजाच्या जावळाचा कार्यक्रम सुमितने व भाग्यश्रीने पार पाडला नि खूप आनंद झाला की आपली भारतीय मुलं जगाच्या पाठीवर कोठेही असलीत तरी आपल्या परंपरा नि संस्कृती काळाबरोबर नव्याजुन्याचा मेळ घालित जपत आहेत याचा अभिमान वाटला.
©ज्योत्स्ना पाटील
संस्कृती व परंपरा👌👌👌👌
ReplyDeleteDhanyavad!
ReplyDelete