एक शाम चाओ प्राया के नाम

सर्व रसिक वाचकांना,
सप्रेम नमस्कार. 
माझे दोन्ही ब्लॉग नियमितपणे वाचणाऱ्या वाचकांमध्ये आता इतर देशातील वाचकांबरोबरच पोर्तुगाल, फिलिपिन्स, जपान, जर्मनी या देशातील वाचकही ब्लॉग वाचत आहेत याचा विशेष आनंद होत आहे. देश-विदेशातील सर्व रसिक वाचकांना मी मनापासून धन्यवाद देते! तुम्हां सर्वांमुळे मला लिहिण्यास प्रेरणा मिळत असते त्याबद्दल मी तुम्हां सर्वांची खूप खूप आभारी आहे. 
            माझ्या लेखातील न आवडणाऱ्या किंवा खटकणाऱ्या बाबींविषयी वाचकांनी आपली मते अवश्य कळवावीत कारण मला माझ्या लेखनातील त्रुटी जाणून घेण्यास वाचकांच्या मतांची नक्कीच मदत होईल. आशा करते की आपल्या सर्वांचे प्रेम व मार्गदर्शन मला नेहमीच मिळत राहील.
ब्लॉगर,
सौ. ज्योत्स्ना पाटील        

                                      ​​  एक शाम चाओ प्राया के नाम  







               जेव्हा जेव्हा सकाळी फिरायला जाते तेव्हा  गोदावरी नदीच्या पुलावर उभे राहिले की हमखास आठवण येते ती ' चाओ प्राया  ' नदीची व ' चाओ प्राया प्रिंसेस ' ची . काश ! आमच्या गोदावरी नदीलाही बाराही महिने भरपूर पाणी राहिले असते तर अशा ' चाओ प्राया प्रिंसेस ' क्रूझ तिच्यावर दिमाखात मिरवल्या असत्या आणि काही लोकांना अर्थार्जनाचा एक मार्ग खुला झाला असता . 
              दि . ३० डिसेंबर २०१४, वर्ष संपण्याची चुटपूट आणि नवीन वर्षाची अनामिक उत्सुकता त्यातच दिवस मावळण्यातील कातरता नि रात्र सुरू होण्यातली झिंग , ना जमीन ना आकाश परंतु त्या दोहोंमध्ये वास्तव्य असलेल्या पाण्यात संथपणे चालणारी बोट ,  ना देशात ना परदेशात कारण दोहोंमध्ये असलेला दुवा म्हणजे बंगालचा उपसागर असले तरीही,  ना उपसागर ना महासागर तर ते आहे आखात . अशा या आखाती  देशातील थायलंड मधील बँकॉक शहरातील चाओ प्राया नदीत संथपणे चालणाऱ्या क्रूझमधील मावळणारा सूर्य व उगवणारा चंद्र यामधला जो अवकाश आहे तो अनुभवणे म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव होय . 
             चाओ प्राया नदीतील ' चाओ प्राया प्रिंसेस ' नावाच्या क्रूझचा थाटमाट हा प्रिंसेस प्रमाणेच होता . आम्ही   क्रूझवर प्रवेश करताच आमच्या स्वागताला थाई कन्या हजर होत्या . नटूनथटून आलेल्या या थाई अप्सरांबरोबर फोटो काढण्याची शक्कल म्हणजे आयतेच पैसे कमविण्याचा त्यांचा एक सहज सोपा मार्ग होय .माझ्या मनातही एक विचार चमकून गेला , या थायी अप्सरांप्रमाणे आम्हांलाही आता नऊवारीतील ललनांना या फोटो व्यवसायाचं ट्रेनिंग द्यावं लागेल की काय ! सबकुछ पैसा हेच तंत्र जगभर त्यात आम्ही मागासलेलो तर नाही ना ! अशी शंका येते . या थायी अप्सरांनी  प्रत्येक पर्यटकाबरोबर फोटो काढायचा आणि नंतर एक तासानंतर त्या प्रत्येक पर्यटकाजवळ फोटोंची टोपली घेऊन , त्यांच्या पुढ्यात ठेवून , " शोधा तुमचे फोटो आणि द्या दोनशे  बाथ (चारशे रुपये ,  थायलंडचे चलन  ) . आमच्या ग्रुपमधले काही नमुने या अप्सरांची फिरकी घेत म्हणाले , " बाई , तुही तर आमच्याबरोबर फोटो काढला मग आम्हांला तूच चारशे बाथ द्यायचे सोडून आमच्याकडून पैसे मागतेस . " नशीब त्या अप्सरांना मराठी येत नव्हते . 
               आमच्या  ' चाओ प्राया प्रिंसेस ' क्रूझवर सजवलेल्या टेबल ,खुर्च्या  व मंद प्रकाशणारे दिवे आणि नटूनथटून आलेले पर्यटक . हिंदी ,इंग्लिश गाण्यांच्या बहारदार संगीतमय जादूत बेधुंद होणारे पर्यटक . ते संपूर्ण वातावरण एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे होते . त्या वातावरणाचा आहोश प्रत्येकाच्या मनमनावर आरूढ झाला होता . आमच्या क्रूझवरील काही पर्यटक नाचण्यात दंग होते तर काही पर्यटक ड्रींक घेण्यात दंग तर काही जेवण करण्यात आणि मला मात्र  संपूर्ण वातावरणाला कायमचे पकडून ठेवावेसे वाटत होते म्हणून मी शांतपणे बसून त्या वातावरणाशी केव्हा एकरूप झाले ते माझे मलाच कळले नाही .सगळी सुख -दुःख विसरून बेधुंदपणे नाचणारे पर्यटक व या पर्यटकांना उत्साहीत करणारे इतर पर्यटक आणि सर्वांना झिंग चढवणारी थायी आवाजातली हिंदी गाणे गाणारी  गायिका आणि वादक.  सर्वच वातावरण प्रत्येकाला संमोहीत करणारे होते . 
               एकीकडे हे बेधुंद वातावरण आणि दुसरीकडे रात्रीच्या शांततेत पाण्यावर उठणाऱ्या संथ लाटा आणि त्या लाटांना छेदत जाणारी आमची क्रूझ . पाण्याखालची खळबळ आणि पाण्यावरची धमाल . क्रुझच्याखाली  जलचरांचा व क्रुझवरती भूचरांचा वावर . एक अदृश्य व एक दृश्य स्वरूपातील . खालच्या जलचरांच्या राज्यात मानवाने केलेले अतिक्रमण आज आपल्याला सुंदर व आल्हाददायक वाटत असले तरी उद्या तेच आपल्यावर उलटते ( नदीला पूर आल्यावर ) तेव्हा आपल्याला भयानक वाटत असते . आजचे नदीवरील आपले अतिक्रमण तर उद्याचे नदीचे आपल्यावरील अतिक्रमण ,  शेवटी माझे वडील म्हणायचे त्याप्रमाणे ," जगात कुठेही जा गोळाबेरीज शून्य , हे जग शून्यातून निर्माण झाले आणि शून्यातच विलिन होणार ." शेवटी माणसाने विज्ञानाच्या जोरावर कितीही प्रगती केली तरी निसर्ग त्याला मूळपदावर आणून ठेवित असतो . माणूस आणि निसर्ग यांची ही लुटूपुटूची लढाई सदोदित चालूच राहणार असा विचार करून मी माझ्या पतीला  बेधुंद होऊन नाचताना पाहिले आणि वाटले की ही क्रूझ अशीच चालू राहावी आणि याला असेच बेधुंद होऊन नाचताना पाहत राहावे . त्याचा तो आनंद सदोदित असाच राहावा असा विचार करीत असतानाच गाणं गाणाऱ्या थाई गायिकेने गाणं थांबवून मध्येच घोषणा केली , " आपल्यासमोर काठावर हॉस्पिटल आहे त्यामुळे आपण सर्वांनी शांत राहावे . हॉस्पिटलचा परिसर ओलांडल्यानंतर आपण गाण्याचा आस्वाद घेऊ शकता . " मी खाडकन माझ्या तंद्रीतून जागे झाले आणि मनोमन थायी नागरिकांच्या या संवेदनशीलतेला  व माणुसकीला मी सलाम केला . आम्ही का नाही असे वागू शकत ?  शाळा , कॉलेज , हॉस्पिटलजवळही आम्ही जोरजोरात गाडीचे हॉर्न वाजवतो . रात्री दहानंतर गाडीचा हॉर्न वाजवू नये हे तर आमच्या गावीही नसते . आमच्याकडील काही महाभाग रात्री मोकळ्या रस्त्यावर हॉर्न वाजवित सुसाटपणे गाडी पिटाळतात जणूकाही रस्ता माझ्या मालकीचा आहे आणि मध्ये कुणी येऊ नका अशीच दमदाटी करताना आढळतात . आजची पिढी शिकली तरीदेखील सार्वजनिक वर्तुणुकीचे , नितीनियमांचे पालन का करीत नाही ? शिक्षणाच्या मूळ हेतूलाच जुगारून टक्केवारीच्या रेसच्या घोड्यांनी आमची नितीमूल्ये चांगलीच पायदळी तुडवलीत तरीदेखील आम्ही जागे होत नाही आणि येणारा काळ आम्हांला माफ करेल का ? असा प्रश्न मनात येताच तेथील त्या सुंदर वातावरणातही मन कुठेतरी खंतावले . 
                दोन मिनिटात हॉस्पिटलचा परिसर ओलांडून आमची क्रूझ तेथून दूर गेल्याबरोबर पुन्हा वातावरणात चैतन्य निर्माण झाले . एक शाम ' चाओ प्राया ' के नाम करून आम्ही तिच्यातून बाहेर पडलो आणि हॉटेलच्या रस्त्याला लागलो .  
©ज्योत्स्ना पाटील 
          
               

Comments

  1. छान, वाचताना मलाच मी क्रुझवर असल्या सारखे वाटले आणि तसा आनंद पण घेतला

    ReplyDelete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या