कालाय तस्मै नमः

                  कालाय तस्मै नमः     
       ​​ ​​प्रवासाला निघाल्यावर कोण भेटेल आणि काय होईल हे सांगणे तसे कठीणच. आम्ही बँकॉकला जायला निघालो असता, आमचा हा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे उत्सुकता होतीच आणि इतरांनी विमान टेक ऑफ होताना छातीत धडधड होते,  भीती वाटते वगैरे बरेच काही काही सांगितले मी मात्र शांत कारण बऱ्याच मोठमोठ्या राईडसवर बसल्यामुळे हवेतल्या सगळ्या हेलकाव्यांचे अनुभव असल्यामुळे विमान प्रवासात फार काही विशेष नसावे अशी मनातल्या मनात कल्पना केलेली होती त्यामुळे मला मात्र विमानात बसल्यावर काहीही थ्रिल वगैरे वाटले नाही पण ढगातून विमान जात असताना मात्र असे वाटत होते की आपल्या आजूबाजूला बर्फ आहे की कापूस! आधीच मला  पांढऱ्याशुभ्र रंगाचे नको तितके वेड आणि त्यात सर्वत्र पांढऱ्या रंगाची शुभ्र नैसर्गिक शाल पाहून असे वाटत होते की विमानाबाहेर सरळ उडी घ्यावी आणि ही पांढरीशुभ्र शाल लपेटून घ्यावी किंवा या ढगातून भन्नाट पळत सुटले तर काय होईल असे वाटून मन कुठल्याकुठे भरकटत असताना मला माझ्या लहान जावेचे शब्द आठवलेत, "ताई, मला विमानाचा प्रवास बिलकूल आवडत​​ नाही . विमानतळावर विमान उतरेपर्यंत माझ्या छातीत सारखे धस्स होत असते. वाटते विमान खाली कोसळले तर काहीच करता येणे शक्य नाही . वाचण्याचा काही पर्यायच नाही . त्या लाईफ जॅकेटचा काही उपयोग होईल यावर तर विश्वासच नाही बसत." माझ्या जावेच्या या वक्तव्यावर माझी पुतणी आईला चिडविण्याची संधी साधून मला म्हणते, "काकू, ट्रेन, बसच्या प्रवासात हातपाय तुटून लाचार जीवन जगण्यापेक्षा विमान कोसळल्यावर एकदाचा कायमचा रामराम ठोकलेला किती चांगला." विमान प्रवासाविषयीचे या दोघी मायलेकींचे संभाषण आठवून मला हसूच आले. माझे व माझ्या पुतणीचे विमानप्रवासाविषयी असलेले एकमत आणि त्यामुळे आम्हांला विमानाचा  प्रवास मनापासून आवडणारा म्हणून त्याविषयी भीती वगैरे वाटण्याचा प्रश्नच नव्हता . विमानात बसल्यावर इतर प्रवाशांचे निरीक्षण करीत असतानाच माझ्याजवळच्या सीटवर  एक महिला येऊन बसली आणि तिच्याबरोबरच्या चौघी मैत्रिणी वेगवेगळ्या जागी बसल्यावर त्या पाचही महामायांनी विमानात जणूकाही त्याच आहेत अशा अविर्भावात गप्पा सुरू केल्यात. एअर होस्टेस लाईफ जॅकेटचे प्रात्यक्षिक देईपर्यंत त्यांच्या गप्पांना बराच ऊत आला होता. एअर होस्टेसच्या मंजुळ आवाजाबरोबर त्यांना गप्पा थांबविणे भाग पडले. त्यानंतर दोघी एअर होस्टेस प्रत्येक प्रवाशाजवळ येऊन कुणाला काय हवे नको याची विचारपूस करून ड्रींक सर्व्ह करीत होत्या. माझ्याजवळच्या बयेने मोठ्या तोऱ्यात बिअर हवी म्हणून सांगितले . मी एअर होस्टेसला कॉफी असे सांगताच त्या बयेने माझ्याकडे अशा काही नजरेने बघितले जणूकाही मी एखाद्या परग्रहावरून आलेली डायनासॉरसारखी अजब प्राणीच होय . थोड्या वेळानंतर मात्र माझ्याजवळ बसलेल्या बयेला काय वाटले कुणास ठाऊक ! तिला माझ्या कॉफीत एवढी उत्सुकता का वाटली तेच कळले नाही . तिने मला न राहवून विचारले , " क्या आप ड्रींक  नहीं लेती ?" आता या बयेचं ड्रिंक म्हणजे बिअर , वाईन पुरतेच सीमित होते तर माझे ड्रिंक पाणी , चहा , कॉफी ,सरबत , कोकम आणि सर्व फळांच्या ज्यूसपर्यंत विस्तारलेले. आता मी नेमके काय उत्तर द्यायचे अशा विचारातच तिला, "नहीं." माझा नकार ऐकताच ती मला म्हणाली,​ ​"आप ड्रिंक नहीं लेती तो क्या आपने जिंदगी का मज़ाही नहीं लिया,​ ​अरे यार पीके तो देखो!" आता मात्र या महामायेला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते कारण एकंदरीत तिच्या अवतारावरून माझे ड्रिंकविषयीचे विचार तिला मानवणारे नाहीत याचा अंदाज आल्यामुळे मी काही न बोलता फक्त एक हलकीशी स्माईल दिली. नंतर तिच्याशी गप्पा करताना मी तिला विचारले," आप जॉब करती हैं या बिझनेस!" यावर तिचे उत्तर ऐकताच मला भोवळ येणेच बाकी राहिले होते. तिच्या तोंडून,​ ​"मैं टीचर हूँ." शब्द बाहेर पडताच मला वाटले मी फारच मागासलेल्या दुनियेत राहते आहे. माझी टीचर नावाची संकल्पना त्या बयेने पुरती धुळीत मिळवून टाकली. माझ्यासमोर वेस्टर्न पोषाखातली ड्रिंक घेणारी आणि आजच्या तरुणांच्या तोंडी असणारी भाषा बोलणारी टीचर पुढच्या पिढीला काय देणार याचे गणित काही केल्या माझ्या टाळक्यात बसत नव्हते. या पाचही बयांची इतर प्रवाशांवर चाललेली शेरेबाजी आणि त्यावरून त्यांचा चाललेला हास्यकल्लोळ पाहून माझी मात्र फुकटात करमणूक झाली. त्यांच्याकडे इतर प्रवाशांनी मात्र ज्या काही नजरेने त्यांच्याकडे पाहीले तेव्हा मात्र मनात खूपच कालवाकालव झाली. या पाचही मैत्रिणी दरवर्षी थायलंडला शॉपिंग करायला जातात असे माझ्याजवळ बसलेल्या महामायेने सांगितले तेव्हा एक टीचर दरवर्षी थायलंडला खास शॉपिंग करायला जात असेल तर तिच्याकडे येणारा पैसा हा नेमका कोणत्या मार्गाने येत असेल हे शहाण्यास सांगणे न लगे ..... ! 
           आजही प्रवासात भेटलेली टीचर आठवली तरी मन बेचैन होते आणि काही विद्यार्थ्यांचे भविष्य डोळ्यांसमोर उभे राहते. कधी कधी वाटते अशा व्यक्ती भेटल्या नसत्या तर ... पण जग चांगल्याबरोबरच अनेक अप्रिय गोष्टींनी पण भरलेले आहे याची सतत जाणीव करून देण्यासाठीच तर भेटत नाहीत ना! शेवटी काय तर कालाय: तस्मैः नमः हेच खरे!  

© सौ. ज्योत्स्ना पाटील    

Comments

  1. खूप छान वहिनी

    ReplyDelete
  2. कालायः तस्मैः नमः अगदि बरोबर असेच चालायचे

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मीना!

      Delete

Post a Comment

Lekhavishayi apale mat deu shakatat.

Popular posts from this blog

कौतुकभरली पुरणपोळी

सिंहगड fort of sinhagad

पुस्तक वाचू या, आनंद लुटू या